

Solapur, 31 May : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभाग हादरवून सोडणाऱ्या गोविंदपूर (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील सामूहिक हत्याकांडप्रकरणी चडचण पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली असून, शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमागे प्रेमप्रकरणातील खुनाचा प्रकार होता, आरोपींच्या मुलाचा खून झाल्याने रामपुरे (तेली) कुटुंबीयांची जमीन कोणीही खरेदी करू नये, असे आरोपी पाटील कुटुंबीयांचे म्हणणे होते. रामपुरे यांनी निराळे कुटुंबीयांना जमीन खरेदीची गळ घातली. निराळे यांनी अप्पुगौडा पाटील याच्या भाच्यांना तुमची संमती असेल तरच शेती खरेदी करायची तयारी दर्शविली. त्या वेळी पाटील कुटुंबीयांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, काही दिवसांनंतर कल्लणगौडा पाटील हे बदलले आणि त्यातून सहा जणांचे हत्याकांड घडले.
गोविंदपूर सामूहिक हत्याकांड प्रकरणी कल्लणगौड ईश्वरगौडा पाटील, अप्पुगौड लक्कणगौडा पाटील, ईश्वरप्पा लगमणगौडा पाटील, प्रकाश बसवराज पाटील, प्रशांत बसवराज पाटील, सिद्धाराम कल्लणगौडा पाटील, लयप्पा नेनेप्पा बिरादार, चिदानंद नामदेव कोळी, महासिद्ध श्रीमंत बिरादार, श्रीमंत शंकरप्पा बिरादार, शंकरप्पा महादेव अरकेरी, अप्पासाहेब शंकर भोवी (सर्व रा. गोविंदपूर) या संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी चैतन्यकुमार दुंडप्पा निराळे यांनी फिर्याद दिली आहे.
गोविंदपूर येथील शेतजमिनीत शुक्रवारी (ता. २९ मे) हल्ला करून दुंडप्पा निराळे (वय ६५), शिवपुत्र निराळे (वय ५८), चंद्रकांत निराळे (वय ५५), राहुल निराळे (वय २५), समर्थ निराळे (वय २३) आणि शब्बीर अत्तार (वय ४५, सर्व रा. चडचण) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील जखमी अरविंद कटगे, जेसीबी चालक संदीप माने यांच्यावर विजयपुरात उपचार सुरू आहेत.
मृत व्यक्तींच्या मोटारीची तोडफोड
फिर्यादी चैतन्यकुमारसह निराळे कुटुंबातील सहाजण चारचाकी वाहनातून (केए ४८, एम १३७५) शेतात आले होते. हत्याकांडानंतर संशयित आरोपींनी त्यांच्या वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर नुकसानग्रस्त अवस्थेत ही कार आढळली. पोलिस अधीक्षक निंबर्गी यांनी त्याचीही पाहणी केली.
अगोदर संमती नंतर बदलले
पाच-सहा महिन्यांपूर्वी ख्यामनिंग संगप्पा तेली (रा. निवर्गी) यांनी दुंडप्पा निराळे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तेली यांनी निराळे यांना प्रेमसंबंधातून घडलेल्या कल्लणगौडा पाटील याच्या मुलाच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगून आल्याचा वृत्तांत सांगितला. त्यानंतर पाटील कुटुंबीय जमीन कसू देत नसल्याने पडीक पडल्याचेही सांगितले.
या भेटीनंतर निराळे कुटुंबीयांसह मान्यवरांनी अप्पुगौडा पाटील याचे भाचे परूगौड व प्रकाशगौड पाटील यांना आपली संमती असेल तरच शेती खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी त्यांनी आपली काही हरकत नसल्याचे स्पष्ट केले. शेती खरेदीनंतर कल्लणगौडा हे गप्प राहिले, मात्र काही दिवसांनंतर उलटले. शेतातील झाडे तोडून स्वच्छ करण्यास विरोध करू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विषय संपल्याचे सांगताच हल्ला
झाडे तोडण्यासाठी निराळे कुटुंबीय सकाळी दहाच्या सुमारास शेतात आले होते. कल्लणगौडा याने त्यास हरकत घेत पंचायत बसविण्याची मागणी केली. त्यावर निराळे बंधूंनी हा विषय संपला आहे, असे सांगताच तो शिवीगाळ करत त्यांना धमकावून परत गावात गेला. त्यानंतर निराळे यांनी नातेवाईक कटगे यांना फोन करून बोलावून घेतले.
जेवण करून ते पुन्हा जेसीबीने शेतातील झाडे काढण्याच्या कामाला लागले. तेव्हा कल्लणगौडासह संशयित १०-१५ जण दुचाकींवर तेथे आले. त्यांच्या हाती कोयता, तलवारींसह मारकास्त्रे होती. त्यांनी शिवीगाळ करीत शस्त्रांनी निराळे कुटुंबीयांसह सोबतच्या लोकांवर हल्ला केला. शेती खरेदी केल्याच्या रागातूनच त्यांनी हे हत्याकांड केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.