prashant paricharak-Rahul Ghule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane FRP : परिचारकांना निवडणूक लढवायला ‘स्वाभिमानी’चालते; पण त्याच ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाकडे दुर्लक्ष कसे करता? : काँग्रेस नेत्याचा सवाल

Mangalvedha Political News : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घेणाऱ्या प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या कारखान्यावरील ऊसदर आंदोलनाकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल राहुल घुले यांनी उपस्थित केला.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 26 Novemebr : 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना चालते. मात्र, त्याच संघटनेच्या वतीने त्यांच्या कारखान्यावर सुरू असलेल्या ऊसदराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दुर्लक्ष का करता, असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड राहुल घुले यांनी केला.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत ऊसदराचा 3250+ 100+100 असा तोडगा निघाला. मात्र, मंगळवेढा तालुक्यातील चार कारखानदार हा तोडगा मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे ऊसदर अद्याप घोषित केला नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारपासून (ता. २५ नोव्हेंबर) कचरेवाडी येथील परिचारक परिवाराच्या मालकीचा युटोपियन शुगर कारखान्यावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही, त्या पार्श्वभूमीवर ॲड राहुल घुले यांनी परिचारक यांच्यावर निशाणा साधला आहे.

ॲड घुले म्हणाले, गेल्या 35 तासांपासून या कारखान्यावर ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीवरून आंदोलन सुरू आहे. आंदोलकाशी चर्चा करणे आणि त्यांचा मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे, याबाबतची भूमिका कारखाना प्रशासनाने घेणे अपेक्षित आहे. मात्र, खासगी जागेत आंदोलन करू नका, असे सांगून कृषी अधिकाऱ्यांकडून दमदाटी केली जात आहेत, असा आरोप घुले यांनी केला.

घुले म्हणाले, कारखान्याची मालमत्ता शेतकऱ्यांनी दिलेल्या उसाच्या उत्पन्नावर मिळाली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कारखानदारांनी ऊस उत्पादकांबरोबर उभं राहणं अपेक्षित असताना चारही कारखानदारांनी अद्याप ऊसदराची घोषणा केलेली नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचे माल कारखानदार द्यायला तयार नाहीत. सध्या साखर 51 रुपये किलो आहे. भविष्यात कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर ७२ रुपये किलो होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तोडगा निघालेल्या दर देण्याचीही मानसिकता कारखानदाराची नाही.

मंगळवेढा तालुक्यात चार कारखाने असताना फक्त एकच कारखान्यावर आंदोलन का? याबाबत ॲड घुले म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखानदाराचे नेतृत्व माजी आमदार प्रशांत परिचारक करतात, त्यामुळे तालुक्यातील कारखान्याचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनी या प्रश्नावर लवकर तोडगा काढावा म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. इतर कारखान्यांवरही उद्यापासून आंदोलन सुरू करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकऱ्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटन युवराज घुले यांनी स्षप्ट केले.

या वेळी सचिन पाटील, समाधान फाटे, दीपक भोसले, अनिल बिराजदार, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, जिल्हा संघटक युवराज घुले, समाधान हेंबाडे, गणेश धोत्रे, शंकर संघशेट्टी आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

कारखाने बंद पडले तर शेतकऱ्यांचेच नुकसान होणार : उमेश परिचारक

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली आहे. अपरिपक्व उसामुळे रिकव्हरी कमी मिळत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील बाकीच्या कारखान्याप्रमाणे दर देणे अडचणीचे असून सद्यस्थितीचा विचार करून दराबाबतचे आंदोलन शेतकरी संघटनांनी मागे घ्यावे. कारखाने बंद पडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, असे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT