Mohite Patil : मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप : ‘सांगोल्यात बोगस मतदान, कोऱ्या मतपत्रिका केंद्राबाहेर नेऊन शिक्के मारून पुन्हा केंद्रात आणल्या...’

Solapur Dcc Bank Election voting 2026 : सांगोल्यात डीसीसी बँक निवडणुकीदरम्यान बोगस मतदान झाल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला. कोऱ्या मतपत्रिकांवर बाहेर शिक्के मारल्याचा दावा करत उमेदवारांच्या तक्रारी नाकारल्याचेही त्यांनी सांगितले.
 Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangola, 26 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सांगोल्यात गुरुवारी (ता. २६ नोव्हेंबर) मतदान सुरू असताना बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला. कोऱ्या मतपत्रिका मतदान केंद्राबाहेर नेऊन त्यावर शिक्के मारून पुन्हा केंद्रात आणल्या जात आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. या प्रकाराबाबत उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख आणि संजय इंगोले यांनी केंद्राध्यक्षांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला त्यांची तक्रार स्वीकारलीही नाही, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले.

खासदार मोहिते-पाटील म्हणाले, संबंधित उमेदवारांनी मतदान केंद्राध्यक्षांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांकडे जाण्यास सांगण्यात आले. पोलिसांनीही हा विषय आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधूनही तक्रार स्वीकारली जात नव्हती. दोन ते तीन तास बोगस मतदान झाल्याचा आमचा आरोप आहे.

मी स्वतः मतदान केंद्रावर आल्यानंतर तक्रार स्वीकारता येत नसेल तर तसे लेखी द्या, असे सांगितल्यानंतर केंद्राध्यक्षांनी उमेदवारांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या. मीदेखील याबाबत लेखी तक्रार दिली आहे, असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेतील मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. बोगस मतदान होत असल्याची तक्रार देऊनही ती स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या केंद्राध्यक्षांना बडतर्फ करावे. तसेच, या प्रकरणात पोलिसांचीही चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आजपर्यंत ईव्हीएममधील मतचोरीबाबत ऐकत आलो होतो. मात्र, आता सत्ताधाऱ्यांकडून मतपत्रिकांचीही चोरी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. संविधानदिनीच संविधानाची पायमल्ली होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

 Dhairyasheel Mohite Patil
Chandrapur BJP: अडीच लाख मतांनी धुव्वा उडल्यानंतर भाजपनं 'गेम प्लॅन' बदलला; चंद्रपूर लोकसभेसाठी देणार कुणबी चेहरा?

सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सोलापूरकरांना एकत्र बसून निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, बाहेरून आलेल्या चोराच्या मदतीने इथं मतांची चोरी सुरू आहे, असा आरोप खासदार मोहिते-पाटील यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केला.

मोहिते पाटील आणि उमेदवारांच्या आरोपांना उत्तर देताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, आम्ही संविधान आणि लोकशाही मानणारे आहोत. पॅनेल प्रमुखांना पराभवाची चाहूल लागली की अशा प्रकारची टीका होणे साहजिक आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यामुळे अशा टीकाटिप्पणीवर अधिक बोलणे उचित ठरणार नाही.

 Dhairyasheel Mohite Patil
Gadhinglaj Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात नव्या मतदारसंघाची चर्चा, नेत्यांची आतापासूनच फिल्डिंग; दोन पाटलांसह मुश्रीफ मैदानात!

मतपत्रिका मतदान केंद्राबाहेर घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. आमच्या पॅनलचे नऊही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वासही आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.