.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Maratha Reservaiton News : माझ्या नादी लागू नका, शहाणे व्हा, तुमचे राजकीय करियर बरबाद करू नका, मला आता कोणाची भिती राहिलेली नाही. तुमच्या बाबतचे अनेक पुरावे माझ्याकडे आले आहेत. माझ्या जातीशी गद्दारी करणाऱ्यांना नावासह लवकरच उघडे पाडणार, असा दावा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. समाजाने आता कोणावरही आंधळे प्रेम करू नये, ज्यांना आपण आपले म्हणून डोक्यावर घेतले तेच आज समाजाच्या मुळावर उठले आहेत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
वडीगोद्री येथे माध्यमांशी संवाद साधतांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांनी पुन्हा नवे खळबळजनक दावे केले आहेत. सरकारमधील कोण कोण कोणाच्या संपर्कात आहे? कोणाला कोणी पैसे दिले आणि मराठा समाजाच्या विरोधात काम करत आहे. या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे आपल्याकडे आले आहेत. येत्या दीड महिन्यात संबंधितांची नावे पुराव्यासह माध्यमांसमोर उघड करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महायुती सरकारवर टीका केली. ज्यांना मराठा समाजाने मोठे केले, डोक्यावर घेऊन नाचले तेच आता समाजाच्या विरोधात वागत आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तोच आपल्या आरक्षणाचे वाटोळे करायला निघाला आहे. मराठा समाजाने आता डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नये आणि आंधळे प्रेम करणे बंद करावे.
एकीकडे मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे प्रयत्न करायचे. तसेच मंत्रीपदाचा गैरवापर करून मराठा तरुणांवर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी दबाव आणायचा हा दुटप्पीपण सुरू आहे. मंत्र्यांच्या खासगी बोलण्याची माहिती कशी मिळते? मंत्री वैयक्तिक पातळीवर काय बोलतात याची माहिती आपल्यापर्यंत कशी पोहोचते असा प्रश्न त्यांना पडेल, असे अनेक पुरावे आपल्याकडे आल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला.
मात्र, आपलीही काही यंत्रणा असून संबंधित लोकांमध्ये आपलेही काही लोक असू शकतात, असे सांगत आताच त्यांची नावे उघड केली तर ते एक मिनिटही त्यांना समोर उभे राहू देणार नाहीत. आपल्या विरोधात बोलण्यासाठी काही लोकांना पुढे करून वारंवार पत्रकार परिषदा घेण्यास सांगितले जाते. माझ्या नादी लागू नका शहाणे व्हा, तुमचे राजकीय करियर बरबाद करू नका, मला आता कोणाची भीती राहिलेली नाही. माझी राख रांगोळी झालेली आहे, पण मी समाजाच नुकसान होऊ देणार नाही. तुमच्या बाबतचे अनेक पुरावे माझ्याकडे आले असून माझ्या जातीशी गद्दारी करणाऱ्यांना लवकरच समाजासमोर उघडे पाडणार आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.