Prashant Paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak : पंढरपूरच्या सहकाराचे परिचारकच ‘किंग’; 49 वर्षे संचालक राहिलेल्या सुधाकरपंतांनंतर पुतणे प्रशांत परिचारक दुसऱ्यांदा जाणार 'डीसीसी'वर

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी ठरावांची लगबग सुरू असून पंढरपुरातील परिचारक गटाची ताकद कायम आहे. विठ्ठल परिवारातील फूट झाल्याने प्रशांत परिचारक यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता वाढली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या ठरावांची लगबग सुरू आहे. पंढरपुरातील सहकार क्षेत्रावर गेली ६० वर्षांपासून वर्चस्व असलेल्या परिचारक गटाची ताकद आजही कायम आहे, त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेवर सोसायटी मतदारसंघातून निवड निश्चित मानली जात आहे. परिचारकांच्या ‘पांडुरंग परिवारा’ला आव्हान देणारा विठ्ठल परिवाराचे तुकडे झाल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे, त्यामुळे परिचारक यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किटने बेंचने दिले आहेत. त्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदारयादी बनविण्याचे काम हाती घेतले आहे, त्यासाठी जिल्हाभर सोसायट्यांचे मतदान प्रतिनिधी ठराव घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

पंढरपूर तालुक्यातील १९० सोसायट्यांपैकी १८३ सोसायट्या निवडणुकीत पात्र ठरल्या आहेत. तसेच १२० दूध संस्थांपैकी १३, तर ७२ बॅंका, पतसंस्था आणि वित्तीय संस्थांपैकी अनेक संस्थांवर माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर परिचारकांच्या कुटुंबातील एकाची वर्णी कायम असायची.

ज्येष्ठ नेते (स्व) सुधाकरपंत परिचारक यांनी १९६६ ते २०१५ पर्यंत तब्बल ४९ वर्षे बॅंकेवर संचालक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय दोन वेळा त्यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. परिचारक गटाचे वर्चस्व आजही पंढरपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर कायम आहे. आजही पंढरपूर पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, पांडुरंग कारखाना, पंढरपूर अर्बन बॅंक अशी सहकारातील सत्तास्थाने परिचारकांच्या ताब्यात आहेत.

सुधाकरपंत परिचारक यांनी अर्ध शतक जिल्हा बॅंकेवर काम केल्यानंतर मागील २०१५ च्या निवडणुकीत त्यांनी आपले पुतणे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून पाठविले होते. त्यामुळे याही निवडणुकीत माजी आमदार परिचारक हे पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर जाणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, ते बिनविरोध जातात की निवडणुकीत जिंकून याची उत्सुकता आहे.

पंढरपूरच्या राजकारणात परिचारकांचा पांडुरंग परिवार, तर विरोधातील विठ्ठल परिवार असे राजकारण विभागले गेले आहे. मात्र, भारतनाना भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवार विभागला गेला आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी आपली वेगळ मोट बांधली आहे, तर कल्याण काळे, भगीरथ भालके यांची तोंडं दोन दिशेला आहेत, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आमदार पाटील, काळे, भालके एकत्र येऊन आव्हान देणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT