Mangalvedha, 24 October : पंढरपूर-मंगळवेढ्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावी, यासाठी समर्थकांनी त्यांच्यावर दबाव वाढवला आहे. मंगळवेढा तालुक्यातील परिचारक समर्थकांनी मेळावा घेत प्रशांत परिचारक यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, त्यांना आमदार करून दाखवू, असा विश्वास श्री दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी बोलून दाखवला आहे. समर्थकांनी दबाव वाढविल्याने आता परिचारक काय भूमिका घेतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे बदल करून दाखवला, त्याप्रमाणे सर्वात जास्त जनाधार असलेल्या प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांना मागील निवडणुकीत थांबावे लागले. पण, सध्याच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांसाठी अपक्ष निवडणूक लढवावी. त्यांना अपक्ष आमदार करून दाखवूया, असा विश्वास दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केला.
शिवानंद पाटील म्हणाले, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या बळावर ज्या प्रमाणे सत्ता बदल करून दाखवला, त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) कितीही आव्हाने असले तरी विधानसभेला बदल करून दाखवू शकतो, त्यासाठी आपण ताकतीने लढूया. कार्यकर्त्यांसाठी प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी.
पंढरपुरात परिचारक यांना मानणारा 55 टक्के मतदार आहे. मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे काम करून परिचारक यांच्यावर आपल्याला गुलाल टाकायचा आहे, ही भावना मनात ठेवून काम करून दोन वेळा आलेले अपयश धुवून काढून पंधरा हजारांचे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी सगळ्यांनी त्यांची मनधरणी करूया, असे आवाहनही शिवानंद पाटील यांनी केला.
जास्त मते असूनही प्रशांत परिचारक यांनी पोटनिवडणुकीत दुसऱ्याला मदत केली. त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत नव्हतो, तो अनुभव तुम्ही घेतला आहे. परिचारक यांना आमदार व्हायची गरज नाही. पण आपणाला आमदार व्हायची गरज आहे, त्यांच्या शब्दाला राजकीय पातळीवर मोठी किंमत आहे, त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी इच्छा होती. मात्र, काही राजकीय समीकरणांमुळे त्यांना अपक्ष लढावे लागणार आहे, असे अजित जगताप यांनी सांगितले.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, काही अडचणींमुळे डावलले असले तरी अपक्ष लढवून आपले अस्तित्व आगामी निवडणुकीत दाखवून देऊया, असेही युन्नुस शेख यांनी स्पष्ट केले. या वेळी दामाजी कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर, सचिन चौगुले यांचीही भाषणे झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.