Pratap Dhakane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pratap Dhakane Active : प्रताप ढाकणे मतदारसंघात 'अॅक्टिव्ह'; शरद पवारांवरील निष्ठा आता तरी कामाला येणार का ?

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर शरद पवार गटाला मोठा फटका बसला. त्यातच पुढील वर्षी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी शरद पवार गटाकडून सुरू झाल्याचे चित्र आहे. अनेकांना मतदारसंघ पातळीवर तयारीला लागा असे आदेश मिळाल्याची चर्चा आहे. यात नगर जिल्ह्यात शेवगाव-पाथर्डीतून आक्रमक व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले प्रताप ढाकणे यांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांना शरद पवारांवरील निष्ठा २०२४ मध्ये कामाला येण्याची चर्चा सुरू आहे. (Latest Political News)

अनेक वर्षे भाजपमधे सक्रिय पदाधिकारी राहिलेले प्रताप ढाकणे २०१४ पूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपातून राष्ट्रवादीमधे आले होते. त्यानंतर २०१४ ची मोदी लाट ओळखून राजळे परिवार भाजपमधे गेला तर विधानसभेची उमेदवारी चंद्रशेखर घुले यांच्या पदरात पडल्याने प्रताप ढाकणेंनी घेतलेल्या पक्षांतर निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र घेतलेल्या निर्णयावर ठाम राहात संघर्ष करण्याची मानसिकता असलेले ढाकणेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही.

ढाकणेंनी मतदारसंघात आपला जनसंपर्क अद्यापही कायम ठेवला. संघर्षशील आणि आपल्या आक्रमक शैलीने ढाकणे आजही मतदारसंघात 'रेस'मधे असल्याचे त्यांचे राजकीय विरोधक मान्य करतात. त्याच अनुषंगाने मतदारसंघात रोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गावा-गावांत नागरिकांच्या गाठीभेटी, विविध कार्यक्रमांचे आयोजन, मतदारसंघातील प्रश्नांवर आंदोलने असे त्यांचे काम सुरूच असते.

राज्यात काहीही राजकीय उलथापालथ होत असली तरी आपले पूर्णवेळ लक्ष केवळ मतदारसंघात असल्याचे प्रताप ढाकणे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. ढाकणे म्हणाले, आपण निष्ठेने शरद पवार यांच्यासोबत आहोत. पक्षफुटीनंतर साहेबांच्या बैठकांना उपस्थित राहात असून विविध कामांबाबत कायम त्यांच्या संपर्कात असतो." उमेदवारीबद्दल ढाकणेंनी कसलेही भाष्य केले नसले तरी साहेब देतील ती जबाबदारी आपण स्वीकारू असे त्यांनी स्पष्ट करताना शरद पवार गटाकडून ढाकणे यांना उमेदवारीसह पक्षात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

आमदार मोनिका राजळे यांच्या रूपाने सलग दोन 'टर्म' शेवगाव-पाथर्डी हा मतदारसंघ भाजपकडे आहे. माजी आमदार राहिलेले घुले बंधू यांची राष्ट्रवादीबाबत भूमिका अजूनतरी संदिग्ध दिसत आहे. मतदारसंघावर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव असताना भविष्यातील घडणाऱ्या घडामोडीतून ढाकणे यांची राजकीय यशापशाची वाट ठरणार असली तरी सध्या ते आता 'अॅक्शन मोड'वर आहेत एवढे मात्र नक्की!

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT