Pune News: ज्येष्ठ साहित्यिक, रानकवी, माजी आमदार ना.धों महानोर (वय ८१) यांचे आज (गुरुवार) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे निधन झाले. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उद्या (शुक्रवार) पळसखेड या त्यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार. ते विधानपरिषदेचे माजी आमदार होते. (Political Web Stories)
निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांची ओळख होती. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते.शेती, ग्रामीण जीवन शब्दबद्ध करणारा, शेती-मातीमध्ये रमणारा, गावगाड्यातील गोष्टी सोप्या शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना साहित्य क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत," असे टि्वट पवार यांनी केलं आहे.
"ना. धों. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों.चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लावून जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात पवारांनी महानोरांना श्रद्धाजंली वाहिली आहे. (Political Short Videos)
महानोरांचा जन्म संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पळसखेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला होता. पण महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेती करायला पळसखेड येथे परतले . मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. (Latest Pune News)
साहित्याचे विविध प्रकार त्यांनी हाताळले होते. विधानपरिषदेत त्यांनी साहित्य, शेतीबाबत विविध प्रश्न मांडले होते. प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती . त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले . शेतीविषयकही त्यांची काही पुस्तके प्रकाशित आहेत.
ना. धों. महानोर यांचे साहित्य विश्व
रानातल्या कविता
वहीरचना
पावसाळी कविता
अजिंठा दीर्घ काव्य रचना
प्रार्थना दयाघना या सहा दीर्घ कविता रचना
पक्षांचे लक्ष थवे निवडक १०० कविता
पानझड
तिची कहाणी
गाथा शिवरायांची
गांधारी (कादंबरी)
गावातल्या गोष्टी (कथा संग्रह)
पुरस्कार
केशव कोठावळे पुरस्कार
पु. ल. देशपांडे काव्य पुरस्कार
भारत सरकारच्या साहित्य अकादमी पुरस्कार
निसर्गरत्न पुरस्कार
कृषी रत्न पुरस्कार
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.