Narendra Modi-Shriniwas Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara-Karad Railway : पाठपुरावा शरद पवारांच्या खासदाराचा अन् कामांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते...!

NCP MP Shriniwas Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील 6 कामांचा शुभारंभ शुक्रवारी होणार आहे.

Vishal Patil

Satara News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील सहा विकासकामांचा प्रारंभ 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कराड आणि लोणंद रेल्वे स्टेशनचा अमृत महोत्सव योजनेतून कायापालट करण्यात येणार आहे. या कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते कामाचा शुभारंभ होत असला तरी खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रश्न मार्गी लावल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या कामाचा शुभारंभ होणार आहे. (Karad Railway Station News)

पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पात गेलेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला मोबदला मिळवून देण्याचा प्रश्न, नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रेल्वेचे अंडरपास ब्रिज किंवा ओव्हरपास ब्रिज मंजूर करणे, रेल्वे स्थानकांची सुधारणा करणे आदी विषयांवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत अनेकदा आवाज उठवला आहे. त्यातील बरेचसे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. तसेच, वेळोवेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रेल्वेच्या विभागीय बैठकीतही त्याविषयी आग्रही पाठपुरावा केला होता. (Narendra Modi)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चार ठिकाणी अंडरपास ब्रिज

सातारा रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण‌ यापूर्वीच झाले आहे. आता खासदार पाटील यांच्या प्रयत्नांतून कराड आणि लोणंद रेल्वे स्टेशनवर अद्ययावत सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या दोन्ही स्टेशनचा समावेश अमृत महोत्सव योजनेमध्ये झाला आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना रेल्वेमार्ग ओलांडताना अडचणी येऊ नयेत, त्यासाठी वेळ वाया जाऊ नये याकरिता ठिकठिकाणी रेल्वे अंडरपासची (बोगदा) आणि उड्डाणपुलांची मागणी श्रीनिवास पाटील यांनी केली होती. त्यानुसार पिंपोडे खुर्द, शिरढोण, जरंडेश्वर आणि पार्ले येथे रेल्वे अंडरपास ब्रिज होणार आहेत.

खासदारांनी मानले आभार 

रेल्वे अंडरपास आणि कराड, लोणंद या रेल्वे स्टेशनचा होणारा कायापालट सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वेचे जनरल आणि डिव्हीजनल मॅनेजर यांचे आभार मानले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT