Ashok Chavan, Prithviraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashok Chavan : अशोकरावांचा राजीनामा अन् पृथ्वीराजबाबांनी बोलून दाखवली मनातली 'ही' खंत

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी अचानक काँग्रेसच्या सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिला. आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पक्षाने त्यांना मानाचे स्थान दिले. विविध पदे दिली. त्यांची आणि पक्षाची नाळ जोडली गेली आहे. आता ते योग्य निर्णय घेतील, असे म्हणत ही घटना दुर्दैवी असल्याची खंत माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली.

अशोक चव्हाणांनी सोमवारी राजीनामा देत काँग्रेसचा हात सोडला. तत्पूर्वी रविवारी ते काँग्रेसच्या मोठ्या बैठकीला उपस्थित असल्याचे पृथ्वीराजबाबांनी (Prithviraj Chavan) सांगितले. आगामी राज्यसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या रणनीतीची रविवारी बैठक झाली. त्यात चव्हाणही होते. दिवसभर सोबत असलेले अशोकराव जाताना बाळासाहेब थोरांतांना सोमवारी सकाळी अकरा वाजता भेटू असे सांगून गेले. दरम्यान, त्यांच्या डोक्यात असे काही चालले आहे, याची भणकही नव्हती, असेही स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाणांनी दिले.

अशोकरावांना काँग्रेसने मोठी संधी दिली होती. पक्षात मानाचे स्थान दिले. जागावाटपाच्या समितीत त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास टाकला होता. वेळोवेळी संधी दिली. सत्तेत स्थान दिले. असे असतानाही त्यांनी असा निर्णय का घेतला हे अनाकलनीय आहे. हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?, असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला.

दरम्यान, (Ashok Chavan) अशोक चव्हाणांसोबत अनेक आमदार काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज थोरात आणि इतर सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क केलेला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरताना बैठक बोलावली आहे. त्यात सर्वजण उपस्थित राहणार असून, कुणीही अशोकरावांसोबत जाणार नाही. भाजपकडून अशा अफवा उठवल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला (BJP) जनता धडा शिकवेल, असा इशाराही चव्हाणांनी दिला आहे. भाजपमध्ये लोकांना समोरे जाऊन निवडणुका लढवण्याची नैतिकता उरलेली नाही. यातूनच ते विरोधातील मोठ्या नेत्यांना आपल्यासोबत घेऊन बहुमतासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपसोबत नेते गेले तरी त्यांना मत देणारी जनता ही काँग्रेससोबतच आहे. निवडणुकीत त्यांना खरे चित्र दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोकरावांबाबत पृथ्वीराजबाबांना अजूनही आशा

अशोक चव्हाणांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करून पृथ्वीराज चव्हाणांना अशोकराव काँग्रेससोबतच राहतील, अशी आशाही आहे. ते म्हणाले, अशोक चव्हाण जन्मापासून काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसनेही (Congress) त्यांच्यासाठी सर्व काही दिले आहे. त्यांच्या मानात नेमके काय चालले आहे? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? त्यांनी पक्ष का सोडला, हे दोन दिवसांत समोर येईल. आता आम्ही सर्वजण काँग्रेससोबत खंबीरपणे आहोत. काँग्रेस आगामी निवडणुकांत मोदी सरकारचा सामना करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT