Pune District Central Cooperative Bank election; Dilip Walse Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

PDCC Bank Election : दहा वर्षांच्या नियमाने भरणे-थोपटेंसह ९ दिग्गजांची कोंडी? वळसे पाटलांनीच सांगितला ‘पात्रतेचा’ फॉर्म्युला!

Dilip Walse Patil On PDCC Bank Election : माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गजांच्या पात्रतेवरून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांच्या पात्रतेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा संचालक होता येणार नाही, या तरतुदीमुळे दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे यांच्यासह नऊ विद्यमान संचालकांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या चर्चेला माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट उत्तर दिले आहे.

‘दहा वर्षांच्या संचालकपदाची तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही. त्यामुळे २०२५ पूर्वीचा संचालकपदाचा कालावधी ग्राह्य धरता येणार नाही. ही तरतूद २०२५ पासून लागू होईल आणि त्यामुळे २०३५ पर्यंत विद्यमान संचालकांना पुन्हा निवडणुका लढवता येतील,’ असा दावा वळसे पाटील यांनी केला आहे. अवसरी खुर्द येथील शांता शेळके सभागृहात झालेल्या शरद सहकारी बँकेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यामुळे पीडीसीसीतील नऊ दिग्गजांच्या पात्रतेवरून सुरू असलेल्या चर्चेला आता वळसे पाटलांच्या या भूमिकेमुळे नवे वळण मिळाले आहे.

‘पूर्वलक्षी प्रभावाने कायदा लागू होणार नाही’

वळसे पाटील यांनी सहकारी बँकांच्या संचालकांच्या दहा वर्षांच्या मर्यादेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही. त्यामुळे २०२५ पूर्वी संचालक म्हणून केलेली सेवा दहा वर्षांच्या मर्यादेसाठी मोजता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय राज्याच्या सहकार विभागाने अपात्रतेसंदर्भात अद्याप स्वतंत्र कायदा केलेला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे पीडीसीसीच्या आगामी निवडणुकीत विद्यमान संचालकांना पुन्हा निवडणूक लढविण्याचा मार्ग खुला असल्याचा त्यांचा दावा आहे.

नऊ दिग्गजांच्या उमेदवारीला दिलासा?

पीडीसीसीच्या विद्यमान संचालक मंडळात दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, दिगंबर दुर्गाडे, रमेश थोरात, रेवणनाथ दारवटकर, दिलीप मोहिते, संजय काळे आणि आप्पासाहेब जगदाळे या नऊ जणांचा समावेश आहे. दहा वर्षांच्या नियमामुळे या सर्वांच्या आगामी उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, वळसे पाटील यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे आता नऊ दिग्गजांच्या जागी नवे चेहरे येणार की विद्यमान संचालकच पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

‘बँकेचा कारभार चांगला असेल तर पुन्हा संधी द्या’

शरद सहकारी बँकेच्या सभेत वळसे पाटील यांनी बँकेच्या कामकाजासह आगामी निवडणुकीबाबतही भूमिका मांडली. सहकारमहर्षी दत्तात्रय वळसे पाटील यांच्या पुढाकारातून १९७२ मध्ये बँकेची स्थापना झाल्याचे त्यांनी सांगितले. बँकेच्या चार पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या असून आगामी निवडणूकही बिनविरोध करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्याच पार्श्वभूमीवर संचालकांच्या पात्रतेबाबत केलेले त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. कारण पीडीसीसीची निवडणूक जवळ येत असताना दहा वर्षांच्या नियमामुळे अनेक ज्येष्ठ संचालकांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या तरी वळसे पाटील यांच्या वक्तव्यामुळे भरणे, थोपटे यांच्यासह नऊ विद्यमान संचालकांच्या पात्रतेभोवती निर्माण झालेला दालसा दायक संभ्रम कायम असला, तरी ‘दिग्गजांना निवडणुकीतून बाहेरचा रस्ता’ या चर्चेला त्यांनी स्वतःच आव्हान दिल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT