

Pune News, 27 Sep : अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि दूध प्रक्रिया युनिट्सवर छापेमारी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली.
या कारवाईनंतर काही राजकीय विरोधकांनी आंबेगावमधील दूध भेसळ प्रकरणामागे दिलीप वळसे पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला. तसेच, या सर्व भेसळीचे मास्टरमाईंड वळसे पाटील असून तेच या प्रकाराचे आका असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या सर्व आरोपांनंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या धाडसत्राबाबत मी पहिल्याच दिवशी माझी भूमिका स्पष्ट केली होती. कोणीही मोठा अथवा छोटा असला, तरी त्याला पाठीशी घालण्याची माझी भूमिका नसणार असल्याचे मी स्पष्ट केले होते."
मात्र, या सर्व धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र दिले होते. या सर्व प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेपाशिवाय निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी पाठवलेल्या या पत्राचे मी स्वागत करतो. कारण, या प्रकरणात मी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही, हे यातून समोर येईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
मात्र, 'एफडीए'कडून धाडसत्र सुरू झाल्यानंतर काही लोकांनी या प्रकरणाचा माझ्याशी संबंध जोडून मी या सगळ्या गोष्टींचा मास्टरमाईंड आणि आका असल्याचा आरोप केला होता. अशा प्रकारचे आरोप करून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यामुळे आता माझ्या विरोधात अशी चुकीची वक्तव्ये करणाऱ्या संबंधित लोकांविरोधात १०० कोटी रुपयांचा दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
याबाबत वकिलांसोबत चर्चा झाली असून, मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला जाणार आहे. यासंदर्भातील नोटिसा संबंधितांना पाठवण्यात येत आहेत. ज्या लोकांनी याबाबत चुकीची वक्तव्ये केली आहेत, त्यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.