Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ध्वनी प्रदूषण आणि डीजेच्या दणदणाटावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. डीजेच्या दणदणाटाला तार्किक विरोध करणाऱ्या नागरिकांना 'गल्लीतलं कुत्री ओळखतात का?' असं वक्तव्य करणाऱ्या भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. "ज्या नागरिकांनी भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली, त्याच सामान्य नागरिकांना आता हक्काचा आवाज मांडण्यासाठी गल्लीतल्या कुत्र्यांकडून प्रमाणपत्र आणावे लागणार का?" असा घणाघाती सवाल काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला आहे.
पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ शहराचीच नव्हे, तर देश आणि जगाची शान आहे. पुणे शहराने समाजाला एकत्र आणणाऱ्या या उत्सवाचे वैभव जगाला दिले असून, काँग्रेस पक्षाला या परंपरेचा नेहमीच अभिमान राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकीय आशीर्वादाने परंपरेच्या नावाखाली डीजेचा बेधडक दणदणाट सुरू झाला आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक गणेशोत्सवाला गालबोट लागत असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली.
"उत्सव हा सर्वांना आनंद देणारा असायला हवा. परंतु, प्रचंड आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, नवजात बालके, गतिमंद मुले आणि मुक्या प्राण्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आवाजाच्या या उन्मादामुळे आपण आपली संस्कृती नासवतोय का, असा प्रश्न पडतो," असे सांगत प्रशांत जगताप यांनी डीजे आणि ध्वनी प्रदूषणाला आपला विरोध दर्शवला.
दरम्यान, पुण्यातील नागरिक विद्याधर बापट यांनी डीजेच्या दणदणाटाविरुद्ध अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तार्किक मांडणी केली होती. त्यावर उत्तर देताना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बापट यांना "त्यांना गल्लीत कुत्राही विचारत नाही" अशा शब्दांत हिणवले होते. भाजपच्या या वक्तव्यावर जगताप यांनी जोरदार टीका केली. "सत्ताधाऱ्यांमध्ये अभ्यासपूर्ण आणि सनदशीर मांडणीला उत्तर देण्याची बौद्धिक कुवत उरलेली नाही. दुर्दैवाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत उन्मादाला खतपाणी घालणारे सरकार असल्यानेच सामान्य नागरिकांचा असा अपमान केला जात आहे," असा आरोप त्यांनी केला.
गल्लीतल्या कुत्र्यांकडून प्रमाणपत्र आणावे का?
विद्याधर बापट यांनी अत्यंत सभ्य आणि तार्किक भाषेत डीजेच्या आवाजाला विरोध केला. परंतु, भाजपकडे त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बौद्धिक कुवत नाही. त्यामुळेच भाजप शहराध्यक्षांनी त्यांना कुत्र्याची उपमा दिली. मग ज्या पुणेकरांनी मतदान करून भाजपला निवडून दिले, त्यांनी स्वतःच्या हक्काचा आवाज उठवण्यासाठी गल्लीतल्या कुत्र्यांकडून प्रमाणपत्र आणायचे का, असा सवाल प्रशांत जगताप यांनी विचारला आहे.
नागरिकच भाजपला दिल्लीतून पुन्हा गल्लीत आणतील!
सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी भाजपवर विश्वास ठेवून त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली. परंतु, आज त्याच नागरिकांना भाजप 'कुत्र्यासमान' समजत असल्याचे धीरज घाटे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी पुणेकर हा अपमान कधीही विसरणार नाहीत. ज्या जनतेने भाजपला दिल्लीत बसवले, तीच जनता भाजपचा हा माज उतरवून त्यांना पुन्हा गल्लीत फरफटत आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जगताप यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.