Pune Municipal Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Fund Controversy : पाच कोटींचा निधी पळविण्याचा ठराव अखेर रद्द; भाजपमधील वादावर तोडगा

Pune Municipal Corporation Rs 5 Crore Fund Controversy : महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक २२, कासेवाडी-डायस प्लॉटमधील विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

Aslam Shanedivan

Pune News : कासेवाडी-डायस प्लॉट प्रभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेला पाच कोटी रुपयांचा निधी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता दुसऱ्या प्रभागात वळविण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधील नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला होता. अखेर बुधवारी (ता. १८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव दप्तरी दाखल करण्यात आला. त्यामुळे भाजपमधील या वादावर पडदा पडला आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करून हा विषय चव्हाट्यावर आणला होता.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक २२, कासेवाडी-डायस प्लॉटमधील विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा निधी प्रभागातील रस्ते, शौचालये, शाळा, उद्याने, पादचारी मार्ग आणि अन्य मूलभूत सुविधांच्या कामांसाठी वापरण्याचे नियोजन होते.

मात्र, २७ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निधी प्रभाग क्रमांक २३ ड, रविवार पेठ-नाना पेठ येथे वर्ग करण्याचा प्रस्ताव नगरसेविका वृषाली कामठे आणि रत्नमाला सातव यांनी मांडला होता. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे हा निधी स्थायी समितीचे सदस्य विशाल धनवडे यांच्या प्रभागात वळविण्यात आला होता.

प्रभाग क्रमांक २२ मधील सामाईक (कॉमन) निधीची तरतूद अन्य प्रभागात वळविण्यात आली असतानाही येथील चारही नगरसेवकांना याची माहिती नव्हती. नगरसेविका अर्चना पाटील यांनी याबाबत सभागृहनेते गणेश बिडकर आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच हा ठराव रद्द करण्याची मागणी केली होती.

भाजपमध्ये यापूर्वीच नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजी वाढली आहे. अनेक नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागातील सहकारी नगरसेवकांशी संवाद नसल्याचे चित्र आहे. निधी आणि विकासकामांच्या वाटपावरूनही वाद सुरू आहेत. हे वाद मिटविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहेत.

त्यातच निधी दुसऱ्या प्रभागात वळविण्याचा हा मुद्दा चव्हाट्यावर आल्याने भाजपने ठराव रद्द करून डॅमेज कंट्रोल केले आहे. बुधवारी विशाल धनवडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत फेरविचाराचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर निधी वर्गीकरणाचा यापूर्वीचा ठराव दप्तरी दाखल करण्यात आला.

“स्थायी समितीमध्ये माझ्या प्रभागात वळविण्यात आलेल्या निधीची मला आवश्यकता नाही. हा निधी प्रभाग क्रमांक २२ मधील विकासकामांसाठी वापरला जावा, यासाठी यापूर्वी केलेला ठराव दप्तरी दाखल करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.”
— विशाल धनवडे, नगरसेवक, पुणे महापालिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT