Pune tribal students protest : पुण्यात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागील १४ दिवसांपासून सुरू आहे. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असतानाच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुण्यातील मांजरी येथील आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांवर ठोस लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. मात्र, सरकारने काही तांत्रिक बाबींवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरहरी झिरवाळ यांनी "तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं आणि आंदोलन करायचो...", असा अजब सल्ला दिला. झिरवाळ यांच्या या वक्तव्यावर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ आक्षेप घेत पलटवार केला. “आम्ही खाऊन-पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही इथे आले नसते,” असे विद्यार्थ्यांनी सुनावले.
गेल्या १४ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा सल्ला दिल्याने झिरवाळ यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची थट्टा केल्याचा आरोप केला जात आहे. आंदोलनाची गंभीरता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली जात आहे का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत असताना झिरवाळ यांच्या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
पाच तास चर्चा, तरी तोडगा नाही
दरम्यान, अशोक उईके यांनी १५ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मागण्यांबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. सरकारने दोन दिवसांची मुदत मागितली असली तरी लेखी जीआर किंवा मागण्या मान्य झाल्याचे ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
त्यामुळे एका बाजूला सरकारकडून चर्चा आणि दोन दिवसांची मुदत मागितली जात असताना दुसऱ्या बाजूला झिरवाळांच्या वक्तव्यामुळे आंदोलनाचा मुद्दा अधिक तापला आहे. आता सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि लेखी आश्वासन देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.