

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहे. त्यांनी सरकारला जर कुणबी जात प्रमाणपत्राचा मुद्दा मार्गी लावला नाही,तर येत्या 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. तसेच, गरज पडल्यास पुन्हा मुंबईला धडकणार असल्याचंही जाहीर केलं आहे. मात्र, याचदरम्यान, राज्य सरकारने आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. यावरुन जरांगे पाटील संतापले आहेत.
राज्य सरकारने दक्षिण मुंबईत आंदोलनांसाठी केवळ आझाद मैदान हेच अधिकृत ठिकाण निश्चित केले आहे. इतर सर्व ठिकाणी मोर्चे, धरणे किंवा आंदोलनांस मनाई केली आहे. सरकारने तसेच सरकारने आंदोलनासाठी नवी नियमावलीही जाहीर केली आहे. याचवरुन मनोज जरांगे पाटलांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यांनी सरकारलाच आव्हान दिलं आहे.
उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील म्हणाले, लोक यासाठी तुम्हाला निवडून देतात की, आपण कसल्याही परिस्थितीत मुंबईला जरी गेलो, तरी आपलं सरकार तिथे आहे. आपले फडवणीस, आपले शिंदे, आपले दादा तिथे बसले आहेत. पण आता जे आपले म्हणून तिथं बसवले, तेच मुंबईत येऊ नका म्हणत आहेत. ही खूप मोठी दहशत झाली. ही सरकारची दादागिरी झाली, पण ही चालत नसल्याचा हल्लाबोलही जरांगेंनी केला.
आमच्यापुढे दादागिरी करायची नाही. मग, आम्ही मुंबईत सगळीकडं आंदोलन करत असतो, विरोध केला, तर रेल्वे फिरू देणार नाही, तुमची विमानं उडू देणार नाही. आम्ही कुणाला मोजत नसतो आणि ऐकतही नसल्याचं स्पष्ट करत एकप्रकारे सरकारची आंदोलनाबाबतची नवी नियमावलीच जरांगेंनी झुगारली आहे.
जरांगेंनी गंभीर आरोप करताना सरकार आमच्याविरोधात जात आहे, लोकांनी, मराठ्यांनी यांना सत्तेवर बसवले. मात्र, त्याच गोरगरीब मराठ्यांना ते आता मुंबईत येण्यापासून रोखत आहे. हा विरोध वाढण्याचे कारण फक्त सरकार असल्याचीही टीकाही त्यांनी यावेळी केली. आम्ही कायदा तुमच्या हातात देतो, सत्ता आम्ही तुमच्या हातात देतो आणि तुम्ही त्याचा गैरवापर करता असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मनोज जरांगेंनी यावेळी म्हणाले, आम्ही कायद्याचा सन्मान करतो,म्हणून तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ. मी जात असतो, आमचं जायचं ठरलं तर मी जाणार, रात्रंदिवस बसणार, तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार? तुम्ही मुंबईत कसे अडवतात हे पण बघतो. तुम्हाला मुंबईत अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा, तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही तर सत्तेतही बसायचं नसल्याचं त्यांनी सांगत सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
राज्य सरकारने यापुढील काळात दक्षिण मुंबईत केवळ आझाद मैदानावरच आंदोलनास परवानगी दिली आहे. तसेच आंदोलनाची वेळही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी ठरवून दिली आहे. एकावेळी जास्तीत जास्त 5 हजार आंदोलक उपस्थित राहू शकणार आहेत. शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनांना मज्जाव करण्यात आला असून केवळ एका दिवसाची परवानगी दिली जाईल. आंदोलनात ट्रॅक्टर, जड वाहने, प्राण्यांना प्रवेश नाही तसेच तंबू किंवा मंडप उभारण्यास मनाई असल्याचंही सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.