Pune Zilla Parishad Global Guruji program; AI Photo sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Singapore Study Tour : ग्रामीण शिक्षण आता ‘ग्लोबल’! पुणे जिल्हा परिषदेच्या 50 जणांचे पथक जाणार सिंगापूरला

Pune zilla Parishad Global Guruji Program : पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ‘ग्लोबल गुरुजी’ या आंतरराष्ट्रीय शिक्षक अनुभव उपक्रमाची घोषणा केली होती.

Sudesh Mitkar

Pune ZP teachers Singapore Training Program : पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी ‘ग्लोबल गुरुजी’ या आंतरराष्ट्रीय शिक्षक अनुभव उपक्रमाच्या निवड प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तज्ज्ञ समितीमार्फत जिल्ह्यातील १३६ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, अंतिम निवडीत ४५ शिक्षकांसह केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले ५० जणांचे पथक सिंगापूरला जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शिक्षकांना १५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान सात दिवसांच्या विशेष शैक्षणिक अभ्यासदौऱ्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्याची अधिकृत घोषणा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

१,२१२ शिक्षकांमधून निवड प्रक्रिया

‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ३०३ क्लस्टरमधून निवड झालेल्या १,२१२ शिक्षकांपैकी १,०२५ शिक्षकांनी १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. परीक्षेच्या निकालाच्या आधारे पुढील टप्प्यासाठी १३६ शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील दोन केंद्रप्रमुखांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अंतिम निवड प्रक्रियेत शिक्षकांची शैक्षणिक आणि प्रशासकीय कामगिरीही विचारात घेण्यात आली.

शाळेतील कामगिरीचा निकष

अंतिम निवडीसाठी केवळ परीक्षेतील गुणांवर भर न देता शिक्षकांच्या मागील वर्षभरातील कामगिरीचा सर्वंकष विचार करण्यात आला. यामध्ये शाळाअंतर्गत मूल्यांकन, विद्यार्थ्यांना मिळालेली शिष्यवृत्ती, विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांतील यश, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांची नावनोंदणी, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, समुदायाचा सहभाग आणि शिक्षकांना मिळालेले पुरस्कार अशा विविध निकषांचा समावेश होता. यामुळे ‘ग्लोबल गुरुजी’ची निवड प्रक्रिया केवळ परीक्षा किंवा मुलाखतीपुरती मर्यादित न राहता शिक्षकांच्या प्रत्यक्ष शैक्षणिक योगदानाचे मूल्यमापन करणारी प्रक्रिया ठरली आहे.

सिंगापूरमध्ये शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास

निवड झालेल्या शिक्षकांना सिंगापूरमधील शैक्षणिक व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. आधुनिक अध्यापन पद्धती, नावीन्यपूर्ण शिक्षण तंत्र, शाळांमधील गुणवत्ता सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा अभ्यास या दौऱ्यात केला जाणार आहे. सिंगापूरमधील अभ्यासदौऱ्यानंतर हे शिक्षक ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करत, तेथील नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि अनुभव जिल्ह्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहेत.

परतीनंतर ‘ग्लोबल गुरुजी’ची खरी परीक्षा!

या उपक्रमाचा उद्देश केवळ काही शिक्षकांना परदेश दौऱ्याची संधी देणे नसून, सिंगापूरमधील आधुनिक शिक्षण पद्धतींचा अनुभव जिल्ह्यातील शाळांपर्यंत पोहोचविणे हा आहे. त्यामुळे सिंगापूर दौऱ्यानंतर हे ५० जण आपल्या शाळांमध्ये नेमके कोणते बदल घडवून आणतात, याकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतींचा अनुभव मिळणार असून, त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT