Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नगर दौरा निश्चित झाला आहे. पंतप्रधान शिर्डी येथे 26 आॅक्टोबरला येत आहेत. या दौऱ्यातून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे.
मोदींच्या स्वागताला उच्चांकी गर्दी जमवायची आहे, त्यासाठी कामाला लागा, अशा सूचना मंत्री विखे यांनी भाजप आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 ऑक्टोबरचा शिर्डी दौरा निश्चित झाला आहे. मंत्री विखे यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेतली, तर दुसरीकडे पक्षपातळीवर भाजप खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वतंत्र मेळावे घेत, नियोजनाचा आढावा घेतला. किमान एक ते दीड लाख नागरिकांची उपस्थित राहील, असे नियोजन करा, अशा सूचना मंत्री विखे यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या वेळी दिल्या.
गर्दी जमवण्यासाठी गावनिहाय वाहनांची व्यवस्था भाजपकडून केली जाणार आहे. याची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर असणार आहे. विविध योजनांचे सुमारे 40 हजार लाभार्थ्यांना वाहनांतून शिर्डीत आणले जाणार आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थादेखील केली जाणार आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची कमान मंत्री विखे यांच्याच हातात असणार आहे.
मंत्री विखे हे केंद्राबरोबरच महाराष्ट्रात भाजप पक्षात वजन वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डीत चौथा दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपमधील बड्या नेत्यांचे दौरे हे नगर उत्तरमध्येच झाले आहेत. त्यामुळे नगर दक्षिणेतील नेत्यांकडून ओरड सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिणचे खासदार असताना भाजपच्या बड्या नेत्यांना नगर उत्तरचे दौरे का? असा सवाल केला जात आहे. या नेत्यांची मंत्री विखे यांनी ओरड काहीशी शांत केली आहे. तरी नगर दक्षिणमधून मंत्री विखे यांना वारंवार आव्हान मिळत आहे. त्यामुळे नगर दक्षिणमधून पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी किती गर्दी जमते, याकडे आता लक्ष लागले आहे.
गर्दी जमवण्याच्या सूचनेनंतर चर्चेला उधाण -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यातील कार्यक्रमाला उच्चांकी गर्दी जमवण्याच्या सूचना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजप खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याने तो, चर्चेचा विषय बनला आहे. ही गर्दी पंतप्रधान यांच्यासमोर जमवून मंत्री विखे यांना काय साध्य करायचे आहे, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू झाली आहे. मंत्री विखे यांचे केंद्रात वाढते वजन, पुत्र खासदार सुजय विखेंसाठी मंत्रिपदासाठी 'फिल्डिंग' तर नाही ना, अशीही चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.