Ahmednagar Politics :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : 'नैतिकतेच्या ऑडिट'वरून ठाकरे गट-भाजपमध्ये जोरदार जुंपली; विखे म्हणाले, "उबाठा तर NPAत गेला..."

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजप नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नैतिकतेचा समाचार घेतला आहे. मंत्री विखे यांनी 'एक्स' खात्यावर पोस्ट करत उद्धव ठाकरे गटाच्या नैतिकतेच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी नागपूर अधिवेशनात येत एन्ट्री घेतली. यानंतर प्रफुल पटेल यांचे इकबाल मिर्ची प्रकरण समोर आले. प्रफुल पटेल हे महायुतीद्वारे सत्तेत असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपला टार्गेट केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनामधून भाजपच्या नैतिकतेवर हल्लाबोल केला आहे. यावर भाजपचे नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक्स खात्यावर ट्विट करत टीकास्त्र सोडले आहे.

मंत्री विखे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांचा संपादक पोपटलाल, असा उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक पोपटलाल यांनी त्यांच्या अडीच वर्षांतील महाविकास आघाडीचे आॅडिट केले असते, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा एपीएत गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी कुठे? असा प्रश्न मंत्री विखे यांनी केला आहे.

आमदार नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ते जेलमध्ये गेले. सध्या वैद्यकीय कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला. पण प्रफुल पटेल यांचे प्रकरण वेगळे आहे. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल आहे, ना ते जामिनावर बाहेर आहेत. उद्या प्रफुल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, तर जी भूमिका नवाब मलिक यांच्याबाबत, तीच प्रफुल पटेल यांच्याबाबतही असती, असेही मंत्री विखे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाने नैतिकतेचे ढोंग अजिबात रचू नये. नवाब मलिक तुरुंगात असूनसुद्धा शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तुम्ही दाखवली नव्हती. हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आॅडिट करायचे असेल, तर तुमच्या अडीच वर्षांच्या काळातील नैतिकतेचे करा. तो रिपोर्ट पाहून तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, असेही मंत्री विखे यांनी म्हटले आहे.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेचे आमदार नवाब मलिक यांचा महायुतीत सत्तेत समावेश करून घेण्यात विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तसे पत्र दिल्यानंतर नागपूर अधिवेशनात गदारोळ सुरू आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी या वादात एन्ट्री केल्यानंतर वादाला वेगळेच वळण लागले. प्रफुल पटेल यांचे इकबाल मिर्चीचे प्रकरण समोर आले. भाजप महायुतीला शिवसेनेसह विरोधकांनी या मुद्द्यावरून घेरले आहे. यातच "सामना"चे संपादक खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नैतिकतेचे आॅडिट या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला आहे. यावरून पुन्हा भाजपविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट, असा "सामना" रंगला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT