Rahul Ghandhi, jaydeep Shinde
Rahul Ghandhi, jaydeep Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Wai : राहुल गांधींनी चाखली स्ट्रॉबेरीची चव; चांदवडीचे सरपंच भारत जोडो यात्रेत

सरकारनामा ब्युरो

वाई : भारत जोडो यात्रेत नांदेड येथील भेटीत राहुल गांधी यांनी चांदवडी (ता.वाई) येथील सरपंच व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस जयदीप शिंदे यांना महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जयदीप शिंदे नांदेडवरून थेट महाबळेश्वरला पोचले आणि स्वतः स्ट्रॉबेरी आणून त्यांना हिंगोली येथे दिली.

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी वाई तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नांदेडला गेले होते. यामध्ये जयदीप शिंदे यांच्यासह युवा नेते विराज शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्पनाताई यादव, सेवा दलाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. प्रताप देशमुख, तालुकाध्यक्ष विलास पिसाळ, सचिन काटे, मंजिरीताई पानसे, प्रदीप जायगुडे, रवी भिलारे, अतुल संकपाळ, अभिनेते व निर्माते तेजपाल वाघ, सारंग वनारसे आदींचा समावेश होता.

या वेळी चांदवडीचे सरपंच जयदीप शिंदे यांची डॉ.विश्वजित कदम यांनी राहुल गांधी यांच्याशी भेट घालून दिली. या वेळी राहुल यांनी तू कुठून आला, कुठे राहता, काय करता, असे विविध प्रश्न विचारले. मी सातारा जिल्ह्यातील वाईहून आलो. आमच्या येथून थंड हवेचे ठिकाण व पर्यटनस्थळ महाबळेश्वर जवळ आहे. वाई, खंडाळा व महाबळेश्वर असा आमचा मतदारसंघ असल्याचे सांगितल्यावर राहुल यांनी स्ट्रॉबेरी आणली आहे काय, असे विचारले.

त्यावर मी दुसऱ्या दिवशी लगेच महाबळेश्वर येथे आलो. किसन भिलारे व स्थानिक उत्पादकांशी संपर्क साधून पहाटे साडेपाच वाजता स्ट्रॉबेरी थेट शेतातून बॉक्समध्ये पॅक करून घेतली आणि सकाळी साडेनऊ वाजता पुन्हा निघालो. पहाटे नांदेडला पोचल्यानंतर डॉ.विश्वजित कदम यांना स्ट्रॉबेरी आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यासोबतच हिंगोली येथे स्ट्रॉबेरी राहुल गांधी यांना दिली. त्यावेळी ‘तुम सच लेके आये,’ असे कुतूहल व्यक्त करून स्ट्रॉबेरी पाहिल्यानंतर इतके खुश झाले की, यात्रा संपल्यानंतर महाबळेश्वरला भेट देण्यासाठी येईन, असे आश्वासन त्‍यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT