Kolhapur News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Crime News : छापा कोल्हापुरात अन् धागेदोरे उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या जिल्ह्यात, बनावट दारूचा मास्टरमाइंड कोण?

Kolhapur Crime News : खरा मास्टरमाइंड साताऱ्यात दडला असल्याची चर्चा आहे, मात्र राजकीय वरदहस्तामुळे...

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरात छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणारे रॅकेट उघडकीस आणले होते. त्याचे धागेदोरे आता राज्य उत्पादन शुल्कमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोहोचले आहेत. कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे छापा टाकून दुसरे रॅकेट उघडकीस आणले आहे. उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्याचा खरा मास्टरमाइंड दडला असल्याची चर्चा आहे. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे त्याला पाठीशी कोण घालत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे बनावट दारूचा साठा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी रात्री पकडला. या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर रेठरे, मलकापूर येथेही छापे टाकून बनावट दारू हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यातच बनावट दारूची तस्करी करण्याची हिंमत कोणाची याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे (ता. कराड) गावच्या हद्दीत बनावट दारूची वाहतूक पकडून रोहित रमेश सोळवंडे (वय 26, रा. कुंडल, ता. पलूस) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट देशी दारूचा साठा व एक चारचाकी वाहनासह एकूण 1 लाख 94 हजार 800 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

त्याच परिसरात देशी दारू दुकानाच्या पाठीमागे छापा टाकून फय्याज मुसा मुल्ला, शेखर गुणवंत बनसोडे याच्या ताब्यातून प्रथम दर्शनी बनावट दारूसाठा तसेच चारचाकी वाहनासह एकूण 1 लाख 40 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या संशयितांकडे चौकशी केल्यावर मलकापूर हद्दीत ग्रीन लँड हॉटेलच्या पाठीमागे व रेठरे बुद्रुक येथील कॅनॉल चौकी या परिसरातील मुलानकी नावाच्या शिवारात छापे टाकून आयाज आबू मुल्ला, इर्शाद ऊर्फ बारक्या शहाबुद्दीन मुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले. बनावट दारूचा साठा तसेच बनावट दारूनिर्मितीसाठी लागणारे साहित्य, कॅप सीलिंग मशीन, बनावट लेबले, बनावट बुचे व इतर साहित्य हस्तगत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्पादन शुल्क विभागासमोर मास्टरमाइंड शोधण्याचे आव्हान :

बनावट दारूची तस्करी करणारांचे अड्डे आणखी कोठे कोठे आहेत, याचा शोध उत्पादन शुल्क विभाग घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यातच बनावट दारूची विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या तस्करीमागे नेमका मास्टरमाइंड कोण? याचा शोध घेणे गरजेचे आहे, अन्यथा मास्टरमाइंड मोकाट राहिल्यास बनावट दारूच्या कारवाईचा बार फुसका जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उत्पादन शुल्कमंत्री सूचना देणार का? याकडेही लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT