Solapur, 02 July : प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी पंढरपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी ६ तालुके पंढरपूर अप्परला जोडण्यात आले आहेत. मात्र, मोहोळ तालुका पंढरपूर अप्परशी जोडण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आजी-माजी आमदारांनीही त्याला कडाडून विरोध दर्शविला आहे, या निर्णयाच्या विरोधात मोहोळमधील ग्रामपंचायती, विविध संस्थांकडून ठराव करण्यात येत असून ते सरकारला पाठविण्यात येणार आहेत.
पंढरपूर येथील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, सांगोला, करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ हे तालुके जोडण्याचा सरकारचा प्रस्ताव वादाचा विषय ठरला आहे. सत्ताधारी भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, मोहोळ तालुका पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या प्रस्तावावर हरकती नोंदविण्यासाठी सरकरने ९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. संबंधित तालुक्यांमध्ये या विषयावर जनमत तयार करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
मोहोळचे माजी आमदार तथा भाजपने नेते माजी आमदार राजन पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायती, सहकारी संस्था आणि विविध संघटनांचे विरोधी ठराव गोळा करून सरकारकडे हरकती दाखल करण्याचे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले आहे.
मोहोळ तालुका पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्याच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. या प्रश्नी आम्ही शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना भेटून भौगोलिक व वस्तुस्थिती सांगणार आहोत. आमची मागणी मान्य झाली नाही तर या प्रश्नी तीव्र संघर्ष करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार पाटील यांनी दिला आहे.
आमदार राजू खरे यांनीही या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय मोहोळ तालुक्याला सोईस्कर आहे. तालुक्याचे सर्व दैनंदिन व्यवहार सोलापूरशी आहेत. त्या संदर्भात आम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मोहोळ तालुका पंढरपूर अप्परमधून नक्की वगळला जाईल.
मोहोळ तालुक्याचे दैनंदिन व्यवहार, शासकीय कामे, शिक्षण, आरोग्य सेवा, व्यापार आणि कृषी मालाची बाजारपेठ ही प्रामुख्याने सोलापूरशी जोडलेली आहे. त्यामुळे काही गावे वगळता बहुतांश नागरिकांसाठी पंढरपूरला जाणे गैरसोयीचे ठरणार आहे, असे विरोधातील लोकांकडून सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.