

Satara, 02 July : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीमधील तीन पक्षांमध्ये जोरदार वाद झाला होता. तो थेट विधान परिषदेत पोचला होता. पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई हे कमालीचे दुखावले होते. त्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल साडेतीन महिन्यांनंतर भाष्य केले आहे. ‘त्या वादानंतर लगेच मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री देसाई यांना सोबत घेऊन बसलो,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महायुतीमधील मित्रपक्षांचा जास्त त्रास होतोय की आधीच्या टर्ममध्ये जास्त त्रास होता? या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला तरी कुठलाही त्रास नाही. माझं सरकार स्मूथ चाललेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आलेले सगळे विषय हे एकमताने मंजूर होतात. आम्ही सगळे जे काही धोरणात्मक निर्णय असतात, ते एकमताने घेतो. पण, एक लक्षात घ्या, आम्ही तीन वेगवेगळे पक्ष आहोत. तीनही पक्षांचे, त्यांचे नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काही अस्पिरेशन्स आहेत, त्यामुळे खूप वेळा स्थानिक स्तरावर आमचे कम्पिटिंग इंटरेस्ट तयार होतात.
आमचे कम्पिटिंग इंटरेस्ट काही जिल्ह्यांत तयार होतात. काही जिल्हा परिषदांमध्ये, तर काही नगरपालिकांमध्येही तयार होतात. पण, ती तात्पुरती भांडणं असतात. म्हणजे ती काही भांडण नसतात, ती कम्पिटिंग इंटरेस्ट असतात. कारण शेवटी आम्हालाही आमचा पक्ष जिवंत ठेवायचा आणि त्यांनाही ठेवायचा आहे. दुर्देवाने अनेक ठिकाणी आता विरोधी पक्ष तेवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे आम्हालाच आपापसांमध्ये त्या ठिकाणी लढाई करावी लागते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप सर्व ठिकाणी मोठा पक्ष आहे, त्यामुळे आमचा प्रेझेन्स हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांत, प्रत्येक नगरपालिकेत, प्रत्येक जिल्हा परिषदेत, प्रत्येक महापालिकेत आहे. आमचे जे दोन मित्र आहेत. त्यात काही जिल्ह्यांमध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे. आम्ही सगळीकडे आहोत. आम्ही जवळपास दोन तृतीयांश ठिकाणी अलायन्स करू शकलो. वन थर्ड ठिकाणी एकत्र येऊ शकलो नाही. भांडण झाली, ती सोडवली. आता आम्ही सोबत आहोत.
साताऱ्यामध्ये काय झालं?
साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिघंच निवडून आलो. त्यात सगळ्यात मोठा पक्ष जवळपास 29 सदस्य आमचे निवडून आले. आम्हाला अध्यक्ष बनवायला 32 सदस्य पाहिजे होते. आता अनफॉर्चुनेटली त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती होती. आम्ही युतीत नव्हतो, आम्ही स्वतंत्र लढलो, त्यामुळे आमच्यापैकी एकजण सत्तारूढ पक्ष होणार आणि एकजण विरोधी पक्ष होणार होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले, आता त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून आला, आमचे सभापती निवडून आले. आता स्थानिक स्तरावर काही कुरबुरी झाल्या. त्याचा राग पालकमंत्र्यांना (शंभूराज देसाई) आला. पालकमंत्री देसाई येऊन त्या ठिकाणी बोलले. शेवटी माणसं आहेत, रागवतात. पण त्याच्यानंतरची परिस्थिती बघा, विधान परिषदेमध्ये आमचा दणदणीत विजय झाला. कुरबुरी संपल्या पण. शेवटी कधी कधी भावनांचा अतिरेक झाल्यामुळे माणसं अशी वागतात, ते फार मनावर घ्यायचं नसतं.
ज्यांना राजकारणामध्ये दीर्घकाळ काम करायचंय, प्रगल्भतेने काम करायचं आहे, त्यांनी अशा गोष्टी एक घटना म्हणून सोडून द्यायच्या असतात. त्या वादानंतर लगेच मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बसलो. पालकमंत्र्यांसोबतही बसलो आणि तो विषय मिटवला, असेही फडणवीस यांनी साताऱ्यातील वादावर भाष्या केले.
दिल्लीत कुठलंही भांडण सुटत नाही
दिल्लीत कुठलंही भांडण सुटत नाही आणि दिल्लीने हे स्पष्टपणे सांगितलं आहे की, या छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच तुम्हाला करायच्या आहेत. दिल्लीला इतकी कामं आहेत की दिल्ली या गोष्टी एंटरटेन करत नाही. हे जे काही असतं ते महाराष्ट्रातच, त्याचे निर्णय होतात. काही अडचणी आल्या तर आम्ही महाराष्ट्रातच सोडवतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.