Rajan Patil-Yashwant Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil Announcement : मोहोळ विधानसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; राजन पाटलांनी मताधिक्याचा आकडाही जाहीर केला!

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 July : विधानसभा निवडणुकीला आणखी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असतानाच माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर केला आहे. विद्यमान आमदार यशवंत माने हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि त्यांना ४४ हजार मताधिक्क्याने निवडून आणायाचे आहे, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. 07 जुलै) मोहोळ येथे आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उमेदवार जाहीर करून टाकला. या मेळाव्याला आमदार यशवंत माने (Yashwant Mane), माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजन पाटील म्हणाले, कोणीही गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आजपासूनच सुरुवात करा. यशवंत माने यांना प्रत्येक गावांतून मागील निवडणुकीपेक्षा जादा मताधिक्य मिळाले पाहिजे, ही खबरदारी गावोगावचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. आपल्याला आमदार माने यांना मागील मागच्या पेक्षा जादा मताधिक्याने निवडून आणायचे आहे.

माझ्याकडे अनेक लोक भेटायला येत असतात, त्यामुळे तुम्ही, मीडिया संभ्रमात असेल. म्हणून मी आजच सांगतो. आपल्या आणि बाबूराव अण्णांच्या विचारांचा, प्रामाणिकपणे काम करणारे उमेदवार हे यशवंत मानेच असतील. आगामी विधानसभा निवडणुकीतील आपले उमेदवार हे यशवंत माने हेच असतील. याची खूणगाठ बांधून आपण सर्वांनी त्यांचे काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एक गाव मायनसमध्ये गेले नाही पाहिजे. मागील निवडणुकीत मतं कमी पडली म्हणून त्या गावांना निधी दिला नाही, असं एक गाव माेहोळ तालुक्यातील मला दाखवून द्या. तसं एकही गाव शोधूनही सापडणार नाही. अनगरपेक्षा बाकीच्या गावांना अधिकचा निधी देण्याचे काम केले आहे, त्यामुळे आजपासून सर्वांनी त्यांच्या कामाला लागावं, असं आवाहन राजन पाटील यांनी केले.

माजी आमदार म्हणाले, मागील निवडणुकीत यशवंत माने हे 22 हजार मतांनी निवडून आले होते. आगामी निवडणुकीत ते 44 हजार मतांनी निवडून आले पाहिजेत, तरच त्यांच्या कामातून उतराई झाली, असे म्हणावं लागेल.

मला काही फरक पडत नाही : राजन पाटील

मला आणि माझ्या मुलांना आता कोणत्या पदाची अपेक्षा नाही. मोहोळ मतदारसंघ आणखी 25 वर्षे आरक्षित राहिला तरी मला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत राजन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT