Solapur, 17 June : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर विरोधक उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्या नियुक्तीचा विषय राजन पाटील यांनी एकाच शब्दात संपवला आहे. या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. एकाच तालुक्यातील या दोन नेत्यांमधून विस्तवही जात नाही. विशेष म्हणजे दोघेही एकाच तालुक्यातील आणि एकाच पक्षात आहेत.
उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या नियुक्तीवर ‘नो कॉमेंट’ एवढीच प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही काहीही विचारले तरी मी त्यावर बोलणार नाही, असे सांगून माजी आमदार राजन पाटील यांनी काहींशी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र, राजन पाटील यांच्या समर्थकांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
मोहोळचे हे दोन्ही पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र आहेत. मात्र, त्यांच्यात मागेही कधी एकमत होऊ शकलेले नाही. दोन्ही पाटील एकमेकांवर अगदी तुटून पडत होते. विशेषतः अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून उमेश पाटील यांनी राजन पाटील आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांच्या विरोधात रान उठवले होते.
त्याच मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील यांनी सर्व विरोधकांना एकत्र करीत राजन पाटील विरोधकाची मोट बांधण्यात पुढाकार घेतला होता. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हते; परंतु आपण अजित पवार यांचे नेतृत्व मानतो, असा त्यांचा त्यावेळीही दावा होता.
विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात प्रचार केला होता. मोदी लाटेत म्हणते २०१४ च्या निवडणुकीतही मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधातील राजू खरे हे निवडून आले आहेत. उमेश पाटील आणि इतरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काची जागा गमावावी लागली होती. त्याची सल राजन पाटील यांच्या मनात आजही आहे. मात्र, ती सल हे बोलून दाखवत नाहीत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सत्ता येतात उमेश पाटील यांनी 5 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा प्रवेश केला त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत अजित पवार यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. याउलट राजन पाटील यांना शरद पवार आणि भाजपकडून ऑफर असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहणे पसंत केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला असताना राजन पाटील मात्र अजित पवारांसोबत कायम राहणार असल्याचे सांगून त्यांच्यासोबत कायम होते. त्यामुळे निष्ठावंत राहूनही विरोधकांना ताकद मिळत असल्यामुळे राजन पाटील समर्थकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.