Rajendra Raut :  Rajan Patil
Rajendra Raut : Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : फडणवीसांच्या विश्वासू नेत्याकडून राजन पाटलांना भाजप प्रवेशाची पुन्हा ऑफर...

राजकुमार शहा

Rajan Patil : बार्शीचे (Barshi News) तालुक्यातील भाजपचे (BJP) सहयोगी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांना भाजप प्रवेशाचे थेट आमंत्रण दिल्याने पाटील कुटुंबीयांच्या भाजपा प्रवेशाच्या थांबलेल्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. यामुळे बार्शीच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या निमंत्रणावरून आमदार राऊत यांनी पेनुर येथील एका खाजगी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पाटील उपस्थित होते. त्यांना उद्देशून बोलताना आमदार राऊत यांनी विकास कामाचा हवाला देत, मार्गदर्शनाची गरज व्यक्त करीत, माजी आमदार पाटील यांनी आता थेट निर्णय घेऊन भाजपा प्रवेश करावा, असा सल्ला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या वेगळ्या वाटेवर चालला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर क्रमांक एक वर नेऊन ठेवले आहे. विकासाचा वारू मोहोळ तालुक्यात चौफेर उधळण्यासाठी माजी आमदार पाटील यांच्या सारख्या मार्गदर्शक नेत्याने विकासाच्या प्रवाहात सामील होण्याची अपेक्षा आमदार राऊत यांनी व्यक्त करीत, पाटील कुटुंबीयांनी आता भाजपात प्रवेश करावा, असे थेट निमंत्रण दिले.

गेल्या वर्षाभरापासून माजी आमदार पाटील आणि त्यांच्या चिरंजीवांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांमध्ये मध्ये गेल्या महिन्याभरापूर्वी खंड पडला होता, मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या छायाचित्र झळकल्याने पाटील परिवाराच्या भाजपच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र पेनुर येथील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याच्या आग्रहावरून आमदार राऊत यांनी मोहोळ तालुक्यात हजेरी लावली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता पाटील कुटुंबियांच्या अत्यंत जवळचा मानला जातो. पाटील कुटुंबीयांच्या सल्ल्यानेच त्या कार्यकर्त्याने आमदार राऊत यांना निमंत्रण दिले असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

आमदार राऊत यांच्या मोहोळ तालुक्यातील हा दौरा म्हणजे पाटील कुटुंबियांच्या भाजपप्रवेशा पूर्वीची मशागत असल्याची चर्चा होत आहे. थेट भाजपात प्रवेश करून कार्यकर्त्यांना धक्का देण्यापेक्षा आमदार राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन, कार्यकर्त्यांची पक्ष बदला बाबतची मानसिकता तयार करण्याच्या प्रक्रियेचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान या संदर्भात माजी आमदार पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, प्रत्येक जण आपल्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत असतो, तोच आमदार राऊत यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी मला निमंत्रण देऊन त्यांची जबाबदारी निभावली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT