Rajan patil-Ajinkyarana patil-Balraje Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil : राजन पाटील ठरले ‘धुरंधर’; सोलापूर Dccत एकाचवेळी दोन्ही चिरंजीवांची बिनविरोध एन्ट्री, मोहिते पाटलांनंतर साधली किमया...

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र विक्रांत आणि अजिंक्यराणा बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित नऊ जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 19 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. बॅंकेच्या १९ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत ९ जागांसाठी २४ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिनविरोध १० जागांमध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांचा समावेश आहे. मोहिते पाटलांनंतर ही किमया राजन पाटील यांनी साधता आली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय जनता पक्षप्रणित समविचारी आघाडीचे १० संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत. यामध्ये आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार प्रशांत परिचारक, विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील, श्रीदीप सुरेश हसापुरे, पृथ्वीराज दिलीप माने, यशवंत संजयमामा शिंदे, सिद्धेश्वर बबनराव आवताडे, शंभूराजे जयवंतराव जगताप हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत, तर अजिंक्यराणा राजन पाटील हे इतर मागासर्वीय मतदारसंघातून (ओबीसी) निवडले गेले आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या केवळ प्रशांत परिचारक यांना जिल्हा बॅंकेत काम करण्याचा अनुभव आहे. आमदार राऊत आणि कल्याणशेट्टी विधानसभेवर दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र, जिल्हा बॅंकेत हे दोघेही प्रथमच निवडून आले आहेत. इतर जागांवर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची दुसरी फळी बॅंकेत आली आहे. यामध्ये राजन पाटील यांच्या दोन्ही चिरंजीवांचा समावेश आहे.

राजन पाटील यांची १९९५ पासून मोहोळच्या राजकारणावर पकड आहे. ते स्वतः तीन टर्म म्हणजेच मोहोळमधून निवडून आले आहेत. मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही राजन पाटील यांनी मतदारसंघावरील पकड ढिली होऊ दिली नव्हती. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची किमया राजन पाटील यांनी २०१९ पर्यंत करून दाखवली होती. याच काळात तालुक्यातील बहुतांश संस्था, जिल्हा परिषदेच्या जागांवर तसेच पंचायत समितीवर पाटलांचे निर्विवाद वर्चस्व होते.

राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत पाटील हे दोनवेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. त्यांनी एकदा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते लोकनेते शुगरचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे बाळराजे पाटील यांना सहकारात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच, अजिंक्यराणा पाटील हे मोहोळ पंचायत समितीवर बिनविरोध निवडून आले होते. सध्या ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्यानंतरही राजन पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. फक्त अजिंक्यराणा पाटील हे ओबीसी प्रवर्गाच्या जागेवरून निवडून आले आहेत. त्यामुळे सोबत असणारे ओबीसी कार्यकर्ते दुखावले जाणार नाहीत, याची काळजी आगामी काळात पाटील यांना घ्यावी लागणार आहे.

विजयदादा-प्रतापसिंहांनंतर बाळराजे, अजिंक्यराणांना संधी

सोलापूर डीसीसी बॅंकेत यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि (स्व) माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील या सख्या बंधूंनी संचालक म्हणून एकाचवेळी काम केले आहे. विजयदादा हे १९७९ पासून २०१८ पर्यंत डीसीसी बॅंकेचे संचालक होते, त्यांनी माळशिरस सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले. प्रतापसिंह मोहिते पाटील हे पणन व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून २००५ ते २०१३ पर्यंत बॅंकेवर काम केले आहे. अध्यक्षपदाची संधी न मिळाल्याने त्यांनी दोन वर्षे आधीच म्हणजे २०१३ मध्ये बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मोहिते पाटील यांच्यानंतर पाटील बंधूंनी एकाचवेळी जिल्हा बॅंकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT