Solapur, 19 June : तब्बल आठ महिन्यांनंतर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेश पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. पण, पाटील यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, उमेश पाटलांच्या निवडीने मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचा गट प्रचंड नाराज झाला आहे. सध्या राजन पाटील 'नो कॉमेंट'च्या भूमिकेत असले तरी ती त्यांची वादळापूर्वीची शांतता ठरण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली आहे. पण, याच उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. कारण यशवंत माने यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या बाजूने खिंड लढवली होती.
अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी उभारण्यात आली होती. त्यात उमेश पाटील यांचा पुढाकार होता, त्यामुळेच खुद्द अजित पवार, सुनील तटकरे यांचा दौरा असूनही मोहोळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्याच मेळाव्यातून अजितदादा आणि तटकरेंनी उमेश पाटील यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली होती. यशवंत माने (Yashwant Mane) यांच्या पराभवात उमेश पाटील यांचाही वाटा आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणारे उमेश पाटील यांना पक्षाकडून बळ देण्यात आल्याने राजन पाटील गट नाराज झाला आहे. ती नाराजी राजन पाटील (Rajan Patil) यांनी अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया देऊन व्यक्त केलेली आहे. जिल्हाध्यक्षपदाची संधी मोहोळला मिळाली आहे. मात्र, अजूनही जल्लोष झालेला नाही.
पाटील समर्थक मात्र सोशल मीडियातून आमचा पक्ष राजन पाटील अशी मोहीम चालवली जात आहे. दुसरीकडे, खुद्द माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव शांत आहेत त्यांनी आतापर्यंत यावर जाहीरपणे कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राजन पाटील यांनी ‘नो कॉमेंट’ पलीकडे जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. काही समर्थक राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, अशी भूमिका मांडत आहेत. मात्र, त्यावरही राजन पाटील यांनी मौन बाळगले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार देताना राजन पाटील यांचा संभाव्य विरोध पक्षश्रेष्ठींना लक्षात घेतला असणार आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांचे समजूत घालणार की पुन्हा दोन नेत्यांना झुलवत ठेवणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.