Rajan Patil-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil On Pawar Resign : पवारांच्या वयाचा विचार करता इतरांनी जबाबदारी घ्यायची की नाही? : राजन पाटलांचा बिनतोड सवाल

Sharad Pawar Resign: सर्वच जबाबदारी खासदार पवार यांच्यावर टाकू नये.

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वयाचा विचार करता इतरांनी कोणी जबाबदाऱ्या घ्यायच्या की नाहीत? शेवटी कोणी जरी अध्यक्ष झाले, तर पक्ष हा शरद पवारांच्याच नावावर चालणार आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, सर्वांची जबाबदारी आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी अध्यक्षपदी राहावे, त्यासाठी सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. सर्वच जबाबदारी खासदार पवार यांच्यावर टाकू नये, अशी अपेक्षा मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी व्यक्त केली. (Rajan Patil's reaction to Sharad Pawar's decision to quit as NCP president)

खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात माजी आमदार राजन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी आमदार पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांना मदत करणारा पक्ष आहे. पवार हे ग्रामीण भागातील नेतृत्व आहे. त्यांच्या डोळ्यातदेखत पक्ष मोठा झाला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे.

यासंदर्भात पाटील म्हणाले की, राज्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे, तर दिल्लीतील जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली तर ते चांगले कॉम्बिनेशन होईल. दोघेही पक्षवाढीसाठी तसेच शेतकरी प्रश्नावर काम करणारे नेते आहेत. आमची पवार यांच्यावर दृढनिष्ठ असल्याचेही माजी आमदार पाटील यांनी नमूद केले.

आपण भाजपत प्रवेश करणार का? या संदर्भात माजी आमदार पाटील यांना विचारले असता ‘तो शेतकरी व मतदारांना विचारात घेऊन घेण्याचा निर्णय आहे. तो माझा एकट्याचा निर्णय नाही. माझा अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजना या पाणी योजनेचा प्रश्न आहे. स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवारसुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रयत्न करतात.

या प्रश्नासंदर्भात मी स्वतः, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. या योजनेची फाईल सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक कपूर यांच्याकडे आहे. त्या फाईलवर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर या योजनेचा सर्वे करण्याचा आदेश निघणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या सरकारचे धोरण पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा असल्याने बरेच पाणी वाचणार आहे. तेच पाणी आम्ही मागतोय. आम्हाला कुठल्याही योजनेचे पाणी कमी करून द्या अशी आमची मागणी नाही. त्यामुळे लवकरच ही योजना मंजुरीच्या मार्गावर असल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी स्पष्ट केले.

सध्या पवारांच्या मार्गदर्शनाची गरज : यशवंत माने

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली असली तरी, त्यांनी तो मागे घ्यावा. सध्याच्या अडचणीच्या काळात पवार यांच्यासारख्या मार्गदर्शकांची सर्वांनाच फार मोठी गरज आहे.

शरद पवार हे १९६७ पासून राजकारणात आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. शेतकऱ्यांशी त्यांची आजही नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातले बारकावे त्यांना चांगले माहिती आहेत, त्यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करण्याची भूमिका घेतली आहे, मग ते सरकार कुठलेही असो. पवार यांनी राजीनामा मागे न घेतल्यास पुढील काळात होणारा पक्षाचा अध्यक्ष हा त्यांच्याच सल्ल्याने काम करणार आहे. पवार म्हणजे चालते बोलते ज्ञानाचे व्यासपीठ आहे. त्यांनी अनेक संस्थांवर उत्तम काम केले आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोनेच केले आहे. सध्या विधानसभेत आणि विधान परिषदेत अनेक नवीन आमदार आहेत, त्यांच्या सारख्यांना मार्गदर्शन होण्यासाठी पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, असे माझे स्पष्ट मत आहे, असे आमदार माने यांनी सांगितले. (Political Web Stories)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT