Solapur, 09 September : गेल्या दोन दिवसांपासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे जोडे मारण्यात आले. संभाजी ब्रिगेडने तर बार्शीत येऊन आमदार राजेंद्र राऊत यांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात बोलणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात मराठा समाजामध्ये असंतोष वाढत आहे. त्यातून धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या वेळी एक मराठा लाख मराठा, आमदार राजेंद्र राऊत यांचं करायचं काय? वर डोकं खाली पाय, अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या.
दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांनी काय केले, हे सांगण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी काय केलं, ते सांगावे. नाही तर बार्शीत येऊन आमदार राजेंद्र राऊत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी दिला आहे.
ते म्हणाले, राजेंद्र राऊत एवढ्यावर थांबले तर ठीक नाही, तर मराठा समाजाचा धडा कसा असतो, ते तुम्हाला माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजेंद्र राऊत यांनी तातडीने माफी मागावी; अन्यथा योग्य तो धडा शिकवला जाईल, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये असंतोष वाढत आहे. ठिकठिकाणी राऊतांचा निषेध करण्यात येत आहे. आगामी काळात राऊत आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.