Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajendra Raut : 'रोहित पवार आता तू हाय अन्‌ मी हाय...' : टीका जिव्हारी लागलेल्या राजेंद्र राऊतांचे खुले चॅलेंज

Vijaykumar Dudhale

Solapur, 11 August : रोहित पवार माझा नाद करू नका. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला आहे, त्या सर्वांना गारीगारचे गाडी लावून दिले आहेत. तुम्हीसुद्धा एखादा गारीगारचा गाडा लावाल. माझा नाद करू नका. असले दहा रोहित पवार आले तरी माझा मी खंबीर आहे.

रोहित पवार आता तुझी आणि माझी जमलीच आहे. आता तू आहे आणि मी आहे, अशा शब्दांत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यात रोहित पवार यांनी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यावर हल्लबोल होता. त्याला राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, रोहित पवार (Rohit Pawar) आणि त्यांच्या परिवाराने किती जमिनी हडप केल्या. कुठल्या बॅंकांना टोप्या घातल्या. तुमचे कारखाने कसे उभे राहिले, हे सर्वांना माहिती आहे आणि या राजा राऊतलाच जास्तच माहिती आहे.

फक्त बारामतीचा विकास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास नाही. बारामतीचा विकास करा. पण इतर तालुके दुष्काळी कोणी ठेवले, हे रोहित पवारांनी आपल्या आजोबांना विचारलं असतं तर बरं झालं असतं, असेही रोहित पवार यांनी नमूद केले.

ते म्हणाले, रोहित पवारांनी जमिनीचा, व्यापाऱ्याचा आणि माझ्या भावाच्या व्यवसायाचा विषय काढला. व्यवसाय करणं हा काही गुन्हा नाही. आम्ही प्रमाणिकपणे व्यवसाय करत आहोत. आम्ही कोणाची एक रुपयाची लबाडी केलेली नाही. कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही केलेला नाही.

कुठलाही उद्योगधंदा न करता रोहित पवार तुमच्या प्रॉपर्ट्या कशा वाढल्या आहेत, याचे उत्तर अगोदर द्या. रोहित पवार तुमची लायकीच काय. संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही आमच्या नावाने ओरडता.

बार्शीतील गुंडगिरी कोणाची होती आणि कोणी मोडीत काढली. हे संपूर्ण बार्शीकरांना माहिती आहे. आम्ही गुंडगिरी करण्याचा प्रश्नच नाही आणि कुठलीही गुंडगिरी आम्ही होऊ दिली नाही. तुम्ही ज्यांच्या सभेला आला होता, त्यांनाही किती कॉन्ट्रक्टची कामं घेतली आहे, हे विचारलं असतं बरं झालं असतं.

रोहित पवार यांनी काय म्हटले होते?

केजीएफ चित्रपटात एक गुंड असतो. त्या गुंडाला वाटतं गावात दुकान माझंच असावं. धंदा माझाच व्हावा. जमीन मीच घ्यावी. वाळू-खडी माझीच असावी. ठेकेदार माझा भाऊच असावा. बार्शीतील काही व्यापाऱ्यांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं की पहिलं मार्केट येथील लोकनेते उघडतात. मग दुसऱ्यांनी मार्केट उघडायचं.

आगामी विधानसभा निवडणूक ही अशा लोकांना धडा शिकवण्याची संधी आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा. सामान्य कार्यकर्त्यांवर येथील लोकप्रतिनिधीचं ऐकून तुम्ही खोट्या केसेस टाकल्या, तर गाठ आमच्याशी आहे, हे लक्षात ठेवावे, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT