Pune News: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी वेगळी वाट स्वीकारली आहे. विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील 288 जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे महाराष्ट्रातील विविध भागात दौरे सुरू आहेत. सध्या ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्याच दौऱ्या दरम्यान त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
त्यांनी केलेल्या आरक्षणाच्या बाबतच्या भाषावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे निवासाला असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची आरक्षणाबाबतच्या भूमिका चर्चेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे.
रोहित पवार यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार पोस्टमध्ये म्हणतात, महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग, केंद्र सरकारची गुजरातवर असलेली मेहरबानी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेला भोपळा, महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचे होत असलेले प्रयत्न आणि त्यात ‘लाडक्या खुर्चीच्या’ प्रेमापोटी गप्प बसलेले सरकार यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात उतरवून २८८ जागा लढण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांनी दिले असल्याचे कळत आहे.
खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असल्याने दलालीतून गलेलठ्ठ झालेल्या सरकारने लाडकी सुपारी योजना सुरु केली असली तरी ‘महाराष्ट्र प्रिय’ असलेले खेळाडू सत्ताधाऱ्यांच्या अडकित्त्यात अडकणार नाहीत, ही अपेक्षा आहे. असो! लाडकी सुपारी योजनेच्या सर्व छोटा मोठ्या सुपारीबाज लाभार्थ्यांसकट या दलाली सरकारचा करेक्ट कार्यक्रम वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही हे मात्र निश्चित आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.