Eknath Shinde | Rajesh Kshirsagar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur: साडेसात वर्षांपासून खिशात कॅबिनेट अन् राज्यमंत्री‍ पदाचा दर्जा; तरीही मंत्रि‍पदासाठी फिल्डिंग : एकनाथ शिंदे ऐकेनात म्हणून थेट 'देवा'ला साकडे!

Rajesh Kshirsagar, Minister Post Demand, Eknath Shinde: शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रिपदासाठी पुन्हा दावा केला आहे. साडेसात वर्षांपासून कॅबिनेट व राज्यमंत्री दर्जाची पदे सांभाळूनही त्यांनी एकनाथ शिंदेंकडे मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली.

Rahul Gadkar

Rajesh Kshirsagar: राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून मंत्रिपदाच्या आशेने देव पाण्यात ठेवून बसलेल्या नेत्यांची संख्या कमी नाही. याच यादीत आघाडीवर असलेले कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आता मंत्रिपदासाठी थेट 'देवाला' साकडे घातले आहे. पण मुळात मागील साडेसात वर्षांपासून दोन दोन मंत्रि‍पदांचा दर्जा खिशात घेऊन फिरणाऱ्या क्षीरसागर यांनी मंत्रि‍पदासाठी अजूनही फिल्डिंग लावल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या या 'राजकीय लोभाची' जोरदार चर्चा रंगली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी क्षीरसागर यांची राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याकडील ही जबाबदारी कायम ठेवली. या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. ठाकरेंनंतर आलेल्या शिंदे सरकारने क्षीरसागर यांच्याकडे 'मित्र' संस्थेचे उपाध्यक्षपद सोपवले. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्षीरसागर यांची फेरनियुक्ती केली. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.

आता एकाचवेळी कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशा दोन पदांचा दर्जा खिशात घेऊन फिरणाऱ्या क्षीरसागर यांची मूळ लाल दिव्याची आशा अद्याप कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रि‍पदासाठी आपला विचार करावा यासाठी त्यांनी थेट देवाकडेच साकडे घातले आहे.

मंत्रि‍पदाची इच्छा व्यक्त करताना राजेश क्षीरसागर म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीनंतर मला मंत्रिपदाची अपेक्षा होती. २०१४ मध्येही सगळ्यांनी मिळून आम्हाला बाजूला केले. पक्षासाठी कडवट होऊन काम करायचेच नाही का? सगळ्यांनी घेरून आम्हाला बाजूला करायचे आणि वरिष्ठांनी त्याची दखल घ्यायची नाही हे कितपत योग्य आहे? मी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड कष्ट केले आहे. २०२२ मध्ये मी सगळ्यांना एकट्याने अंगावर घेतले. नंतर एकेक करत पक्षात आले पण सुरुवातीला राजेश क्षीरसागर निधड्या छातीने लढला.

साहेबांना मी दोष देत नाही, त्यांच्या देखील काही अडचणी असतील. पण अडचण एकदा ठीक आहे. मी मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहे. साहेबांनी अडीच वर्षांनी मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले आहे. दिवंगत अजित पवार देखील एकदा म्हणाले होते, लाठ्याकाठ्या खाणाऱ्या राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळेल. माझी धडपड विरोधकांना कळती, पण आता माझ्या नेत्यालाही कळू दे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करणार आहे.

नवीन आलेला कुणीही उठतो आणि पद मागतो, महामंडळ मागतो. पण जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी आग्रही आहे, मी २४ तासांपैकी १८ तास काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यालयात कोण व्यापारी भेटणार नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर भेटणार नाही. इथे येणारी माणसं सर्वसामान्य आहेत. अशावेळी मला वाटते मी कुठे कमी आहे का? माझे मेरीट नाही का? खूप वाईट वाटते, अशी खंतही क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT