Raju Shetti distances himself from Islampur municipal election politics after years of dominance. May be benefit to Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : राजू शेट्टींच्या छुप्या मदतीने जयंत पाटलांची लढाई सोपी? भाजपविरोधी ताकदीला सुरुंग

Sangli Politics : मागील 20 वर्षांपासून केंद्रस्थानी असलेले राजू शेट्टी यावेळी इश्वरपूर राजकारणापासून दूर राहिले. जयंत पाटील यांच्यासोबत पुन्हा झालेल्या समीकरणामुळे त्यांनी शांतपणे बाजू घेतल्याची चर्चा आहे.

Hrishikesh Nalagune

Sangli Politics : मागील 20 वर्षांपासून वाळवा तालुक्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावेळी मात्र ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बेदखल होते. कधी काळी त्यांच्याशिवाय जयंत पाटील विरोधकांचे पानसुध्दा हलायचे नाही. पण यावेळी ते आष्टा-ईश्वरपूरच्या राजकारणापासून लांबच राहिले आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा जुळलेला दोस्ताना यामागे कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

शेट्टींनी राज्यातील साखर कारखानदारांना लक्ष्य करीत स्वतःची राज्यव्यापी ओळख तयार केली. निवडणुकीच्या राजकारणात दोन वेळा खासदारकी पटकावत यश मिळवले. आज ते राज्यातील शेतकऱ्यांचे आघाडीचे नेते आहेत. त्यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भाग राहिलेल्या वाळवे तालुक्यात त्यांनी आपले राजकीय बस्तान बसवले होते. त्यासाठी त्यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले. जयंतविरोधकांचे ते मार्गदर्शक झाले. शेट्टी यांनी कायमच जयंत विरोधकांना सोबत घेऊनच राजकारण केले.

गत नगरपालिका निवडणुकीवेळी निशिकांत पाटील यांना जयंत पाटील यांच्यापासून फोडून त्यांनी विकास आघाडीची मोट बांधत जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात विजयश्री खेचून आणली. त्यावेळी नानासाहेब महाडिक व आमदार सदाभाऊ खोत यांची मोट बांधत त्यांनी उमेदवार ठरवण्यापासून प्रचाराच्या सर्वच आघाड्यांवर किल्ला लढवला. विरोधकांसाठी तेव्हा शेट्टींचा शब्द प्रमाण होता. यावेळी मात्र ते कुठेच चित्रात दिसले नाहीत. त्यांचे म्हणून असलेले काही कार्यकर्तेही दिसले नाहीत.

राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत पुरते भाजपचे आमदार आणि उजवे हात झाले आहेत. शेट्टींचे त्यांच्याशी विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. मोठ्या वाक् युद्धानंतर आता त्यांच्यात आता मौनातील फारकत झाली आहे. शेट्टींनीही तालुक्यात संपर्क कमी केला आहे. काहीकाळ त्यांचा जयंतरावांशी घरोबा होता. पण लोकसभेवेळी त्यांनी काडीमोड घेतला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर पुन्हा शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यात गट्टी जमली आहे.

सलग दोनवेळा लोकसभेला झालेला दारुण पराभव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसदराबाबत कमी झालेली आक्रमकता यामुळे त्यांची ताकद घटली आहे. संघटनेचा स्वतंत्र गट बांधून ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. मोजकेच व सर्वसामान्य कार्यकर्ते शेट्टींसोबत राहिले आहेत. यापूर्वी कोणत्याही निवडणुकीत शेट्टी वाळवा तालुक्यात तळ ठोकायचे. मात्र गेल्या दोन महिन्यांत त्यांनी कोणालाच साद घातली नाही. तेही फिरकले नाहीत. पण याचा थोडा का होईना पण फायदा जयंत पाटील यांना दोन्ही नगरपालिकांमध्ये होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT