

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक रणांगण तापत आहे. त्यामुळे नेत्यांचे कारभारी आतापासूनच फ्रंटफूटवर आरोप-प्रत्यारोप गाजवत असताना दिसत आहेत. तर जिल्ह्यातील विविध पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या पॅवेलियनमध्येच आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक हे मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी कारभाऱ्यांनीच हालगी तापवण्यास सुरुवात केली आहे.
यंदाचे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही वर्षांपासून याच कारभाऱ्यांनी आपला गट आणि पक्ष मजबूत ठेवण्यावर भर दिला होता. मात्र, आता तेच कारभारी निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षाचे झाले आहेत. नेत्यांची बंदूक आपल्या खांद्यावर घेऊन विरोधकांचा गेम करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे यंदा महानगरपालिका निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत यंदा महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे. अशातच यापूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर मित्र असलेले नेते या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे राहताना दिसणार आहेत.
गेली अनेक वर्ष वरिष्ठ नेत्यांसोबत असलेला कारभारी यंदा दुसऱ्या पक्षात गेला आहे. सोबत असताना अनेक राजकीय डावपेचाची माहिती कारभाऱ्यांकडे आहे. तर कारभाऱ्याने केलेल्या अनेक घटनांची पाठराखण केलेली यादी जिल्ह्यातील नेत्यांकडे आहे. त्यामुळे कारभारीच आता विरोधातील नेत्यांचा गाडा हाकणार असल्याने यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी देखील या कारभाऱ्यांवर बोलण्यासाठी दुसरा कारभारी मैदानात उतरवलेला आहे.
सत्यजित उर्फ नाना कदम हे यापूर्वी भाजप आणि ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होते. ताराराणी आघाडीचा गटनेता म्हणून कदम यांची ओळख होती. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे असल्याने महाडिक यांच्या राजकारणात त्यांची प्रमुख भूमिका होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत झालेल्या घटनेने कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून महाडिक गटाची नस कदम यांना माहिती आहे. शिवाय महाडिक गट कोणत्या क्षणी कोणता डाव टाकतील याची पुरेपूर कल्पना कदम यांना आहे. पण महायुतीमध्येच कदम यांनी प्रवेश केल्याने या महापालिका निवडणुकीत भाजप आणि महाडिक गटावर टीका टाळण्याची शक्यता आहे. मात्र, ही निवडणूक स्वतंत्र झाल्यास महाडिक गटाचे अनेक डावपेच कदम उघडे करू शकतात. शिवाय महाडिक गटाकडे कदम यांच्या बाबतीत अनेक राजकीय घडामोडी असू शकतात. मात्र सद्यस्थिती पाहता महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना एकत्र असल्याने दोघेही एकमेकांच्या वरील टीका टाळू शकतात.
काँग्रेसचे तत्कालीन गटनेते शारंगधर देशमुख यांनी नुकताच शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या 'साम-दाम दंड भेद'च्या राजकारणात देशमुख हे आघाडीवर होते. दक्षिण विधानसभा मतदार संघात देशमुख यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शिवाय महानगरपालिकेच्या राजकारणात देखील आमदार सतेज पाटील यांनी देशमुख यांना चांगली साथ दिली आहे. स्थायी समिती सभापती पदासोबत त्यांनी काँग्रेसमध्ये तितकीच तोलामोलाची जबाबदारी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर देशमुख यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सतेज पाटील शारंगधर देशमुख यांच्याबाबत चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. त्याची झलक त्यांनी प्रभाग क्रमांक 20 मधून झालेल्या एका कार्यक्रमात दाखवून दिली.
त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिलेले आणि ऐनवेळी नाकारलेले, पण काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून पुरस्कृत उमेदवार दिलेले राजेश लाटकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन देशमुख आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे लाटकर हेच आता काँग्रेसच्या बाजूने फ्रंटफुटवर असताना दिसत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून देशमुख यांनी लाटकर यांच्यावर टीका टिप्पणी करत थेट पाईपलाईनचे पाणी कोणत्या रंगाचे आहे. हे मी वेळ आल्यावर सांगतो, असा इशारा दिला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत आतापासूनच कारभाऱ्यांने फ्रंटलाईनवर राहून सुरुवातीच्या टप्प्यात विरोधात त्यांच्या कारभाऱ्यांचा कसा गेम होईल? याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नेत्यांबरोबरच शारंगधर देशमुख, सत्यजित उर्फ नाना कदम, राजेश लाटकर यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली दिसेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.