Raju Shetti Amit Shah Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Sangharsh Morcha:'..तर 'जावया'लाही कोल्हापुरात पाऊल ठेवून देणार नाही!'; राजू शेट्टींंनी संघर्ष मोर्चातून थेट अमित शहांनाच ठणकावलं

Kolhapur Politics: गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. सतेज पाटील मोठा धक्का बसला असून त्यांच्या समविचारी आघाडीच्या अध्यक्षपदाचा तोंडचा घास हिरावण्याची वेळ आली आहे.

Deepak Kulkarni

Kolhapur News: गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. सतेज पाटील मोठा धक्का बसला असून त्यांच्या समविचारी आघाडीच्या अध्यक्षपदाचा तोंडचा घास हिरावण्याची वेळ आली आहे. अशातच,आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टींनी थेट कोल्हापूरचे जावई अन् गृहमंत्री अमित शहांनाच कडक इशारा दिला आहे.

महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापूरमधील दसरा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संघर्ष मोर्चा सोमवारी (ता.9 नोव्हेंबर) काढण्यात आला. यात भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण तसेच जमलेल्या प्रचंड गर्दीने दसरा चौक भरुन गेला होता.या संघर्ष मोर्चात काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी शेट्टींनी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवरही टीकेची तोफ डागली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटलांच्या नेतृत्वातील समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा तर महायुतीकडे 12 जागा आहेत.मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम दोन्ही पक्षांकडे नाही.त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यासह त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्यासंबंधीचा निर्णय महायुती सरकारकडून घेतला आहे. या निर्णयामुळे गोकुळचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, जर तुम्हाला अध्यादेशच काढायचा असेल तर अजून एक काढा. गोकुळमध्ये तुम्ही पाच स्वीकृत संचालक केले आहेत,अजून सहावा एक घ्या, अजून एक अध्यादेश काढा, तो राज्याबाहेरचा घ्या आणि अमित शाहांना स्वीकृत संचालक करा आणि एवढंच नव्हे, त्या अध्यादेशामध्ये अशी तरतूद करा,स्वीकृत संचालकाला चेअरमन होता येईल आणि रितसर एकदा अमित शाहाला चेअरमन करून टाका, मग तरी समाधान होईल तुमचं? अशी सडकून टीका त्यांनी केली.

त्यांनी आम्ही जोपर्यंत जावयाचा आदर करतोय,तोपर्यंत करतो.जावई जर का शहाणपणा करायला लागला आणि सासुरवाडीवरच डोळा ठेवायला लागला,तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही, असा इशाराही शेट्टींनी गोकुळच्या मोर्चातून दिला आहे.

ते म्हणाले, आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा.सतेज पाटील साहेब आम्ही ईडी-बिडीला घाबरत नाही.कुणी घाबरतंय? काय करायचं आहे करा, बघू एकदा.त्या ईडीच्या पण उचापती करू आम्ही.आता मढ्याला काय मरणाची भीती हो? मढ्याला काय मरणाची भीती? होऊन जाऊ दे एकदा,असा हल्लाबोलही शेट्टी यांनी केला.

तसेच उद्या काही भानगडी करून,कोरम दाखवून,त्या पाच संचालकांना आणून जर त्यांनी चेअरमन निवड केला, तर मी तुम्हाला सांगतो,ते आत येतील पण बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेणार आहे. उद्या घेराव घालायचा आहे काय गोकुळला? उद्या सगळेजण येऊ या. बाहेर मग खांद्यावरूनच परत गेली पाहिजेत. बघूया एकदा काय होतंय ते असा इशाराच त्यांनी दिला.

त्यांची पण माणसं आणणार आहेत. माझं म्हणणं आहे, आणा एकदा बघूया तुमची किती आहेत ते बघूया आणि आम्हीही येतो. एकदा फ्री स्टाईल होऊनच जाऊ दे. तुम्ही जर का अशा पद्धतीनं कटकारस्थान करून आमचं गोकुळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर एकाचाही पाय शिल्लक राहणार नाही,

शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, देवेंद्र फडणवीस, लक्षात ठेवा, तुम्ही एका बाजूला गोकुळ एका जिल्ह्याचा संघ आहे, आम्हाला त्यात रस नाही असल्याचं म्हणता. मग तो जर एका जिल्ह्याचा संघ आहे, मग तुम्हाला एवढा त्याच्यामध्ये रस का? खरं तर निवडणूक ज्यावेळी झाली, ज्यावेळी तो का जो कायदा होता, जो अधिनियम होता, त्या अधिनियमाच्या आधारावर अध्यक्षनिवड व्हायला पाहिजे होती. पण तुम्ही परत अध्यादेश काढला.

तो धरून आणलेला राज्यपाल तुम्ही इथं बसवलेला आहे. असले धंदे कोल्हापूरपुढं चालणार नसल्याचा सज्जड दमही त्यांनी यावेळी भरला. तसेच खरोखरच लोकशाहीची चाड होती, तुम्हाला खरोखरच लोकशाहीसाठी कोरम पूर्ण होत नाही, म्हणून जर का स्वीकृत सदस्य नेमायचे होते, तर त्यांना मतदानाचा अधिकार का दिला? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राला द्यावं लागेल, असं आव्हानही त्यांनी महायुती सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT