

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. शासननियुक्त चार सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. १०) होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापूर डीसीसी बँकेत बैठक घेत सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचा उमेदवार विजयी होईल, अशी घोषणा केली, तर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटलांवर निशाणा साधला.
न्यायालयाचा निर्णय काय?
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांच्या सहभागाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. निवडणुकीत निवडून आलेल्या २५ सदस्यांसोबत शासननियुक्त चार सदस्यांनाही मतदान करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले असले, तरी या चार सदस्यांची मते स्वतंत्र ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. या निकालामुळे सतेज पाटील यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
महायुतीच्या बैठकीनंतर आबिटकरांची मोठी घोषणा
न्यायालयाच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांची कोल्हापूर डीसीसी बँकेत बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. न्यायालयाचा निर्णय आणि राज्य शासनाने काढलेला अध्यादेश यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचा चेअरमन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आबिटकर म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मात्र, या मुद्द्यांबाबत वस्तुस्थितीला सामोरे जाण्याऐवजी आमच्याकडे जनादेश आहे आणि सत्तेपासून आम्हाला रोखता येईल, अशी भूमिका घेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राज्यभरातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही करण्यात आले.
गोकुळ दूध संघाच्या बायलॉजमध्ये असलेल्या तरतुदी इतर सहकारी संस्थांपेक्षा वेगळ्या आहेत. या तरतुदींमुळे अनेकांना नेमकी कायदेशीर परिस्थिती समजली नाही. त्यामुळे शासन विनाकारण हस्तक्षेप करत असून निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणत असल्याचा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, असे आबिटकर यांनी सांगितले.
'समन्वयाने कारभार करण्याऐवजी कायद्याचा आधार घेतला'
गोकुळच्या कारभारात सर्वांना विश्वासात घेऊन पुढील पाच वर्षांसाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत चर्चा व्हायला हवी होती. मात्र, आमच्याकडे जनादेश आहे आणि तुम्ही आमच्यासोबत आले पाहिजे, असा आग्रह धरला जात होता. इतकेच नव्हे, तर आमच्या १२ सदस्यांनी न्यायालयात हजर राहावे, यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
प्रत्यक्षात आम्ही तुमच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलो आहोत. तुमचे १३ आणि आमचे १२ सदस्य आहेत. त्यामुळे समन्वयाने पुढे जाणे अपेक्षित होते. मात्र, समन्वय साधण्याऐवजी कायद्याचा आधार घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने आजच्या निर्णयातून या भूमिकेला चपराक दिली आहे, अशी टीका आबिटकर यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, आता गोकुळमध्ये पुढील पाच वर्षे प्रशासक येण्याची किंवा नव्याने निवडणूक घेण्याची वेळ येणार नाही. दूध उत्पादकांना न्याय मिळावा आणि संघाचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी शासन आणि न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्या होणाऱ्या निवड प्रक्रियेत महायुतीचा चेअरमन निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'बायलॉज बदलण्याचा अधिकार जनरल बॉडीला'
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनीही पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला. कोणत्याही सहकारी संस्थेचा कारभार तिच्या बायलॉजनुसार चालतो. देशाचा कारभार जसा संविधानानुसार चालतो, त्याचप्रमाणे संस्थेचा कारभार बायलॉजनुसार चालतो. या बायलॉजमधील तरतुदींमध्ये बदल करायचा असल्यास त्याचा अधिकार जनरल बॉडी अर्थात सर्वसाधारण सभेला असतो. गोकुळची सर्वसाधारण सभा आता होऊन गेली असून पुढील सभा सप्टेंबरमध्ये होणार आहे. हे माहीत असतानाही शासनाला बायलॉज बदलता आले असते, असा दावा करण्यात आला. हा चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होता, अशी टीका महाडिक यांनी केली.
'गोकुळ डी. वाय. पाटील दूध संघ होणार नाही'
आजच्या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांपेक्षा बाहेरच्या जिल्ह्यांतील लोकांची संख्या अधिक होती, असा दावाही धनंजय महाडिक यांनी केला. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाचे अस्तित्व आणि त्याची स्वतंत्र ओळख कायम राहणार असल्याचे सांगत, 'गोकुळ दूध संघ हा डी. वाय. पाटील दूध संघ होणार नाही,' असा टोला त्यांनी सतेज पाटील यांना लगावला.
एकीकडे न्यायालयाच्या निर्णयामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे, तर दुसरीकडे महायुतीनेही आपला उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता अधिकच रंगतदार झाली आहे. सतेज पाटील यांच्या गटाची पुढील भूमिका काय असणार आणि अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.