Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan News : माढ्यात भाजपच्या निंबाळकरांविरोधात राष्ट्रवादीकडून 'राम'अस्त्र

Sharad Pawar आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रयत्न सुरु आहेत.

Umesh Bambare-Patil

Madha Election News : राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी सध्या मतदारसंघनिहाय चाचपणी सुरू केली आहे. फलटणच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामराजेंना दिल्लीला पाठवावे, असे सांगत माढा मतदारसंघातून रामराजेच उमेदवार असतील याचे संकेत दिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यापुढे रामराजेंचे आव्हान असेल.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा व माढा मतदारसंघावर विशेष लक्ष दिले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत. तर माढा मतदरसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar करत आहेत.

पूर्वी माढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेथून निवडणूक लढवली अन् ते विजयी झाले. २०१४ मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी मंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांना उमेदवारी दिली. तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून तेथे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती.

या निवडणुकीत विजयसिंह मोहिते - पाटील यांचे बंधू (कै.) प्रतापसिंह मोहिते - पाटील हे अपक्ष लढले होते. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघाचा गड राष्ट्रवादीने राखला होता. २०१९ मध्ये मात्र, विजयसिंह मोहिते - पाटलांना डावलून राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली. तर भाजपकडून रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळी मोहिते - पाटलांची साथ न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यातून हा मतदारसंघ गेला.

आता हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली आहे. रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना शह देण्यासाठी फलटण संस्थानातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक - निंबाळकर यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. फलटणमध्ये रामराजेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्कार कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामराजेंना दिल्लीला पाठवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याबाबत आपण सर्वांनी शरद पवार यांच्याकडे तशी आग्रही मागणी केली तर ते नक्की ऐकतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे माढा मतदारसंघासाठी रामराजे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार, हे निश्चित आहे. केवळ शरद पवारांच्या होकाराचा प्रश्न बाकी आहे. सर्वांच्या मागणीवर पवार हे देखील रामराजेंच्या नावाला दुजोरा देतील. पण, रामराजेंकडून याला मान्यता मिळणे महत्वाचे आहे. तसे झाल्यास खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्यापुढे आगामी निवडणुकीत रामराजेंचे आव्हान असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT