Rajan Patil-Ramesh Kadam
Rajan Patil-Ramesh Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil News : ‘राजन पाटलांना मानावेच लागेल; कारण...’ : रमेश कदमांनी केले कौतुक

राजकुमार शहा

Mohol News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी कारागृहातून सुटून आल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचे कौतुक केले आहे. ‘राजन पाटील यांना मानावेच लागेल. कारण त्यांनी इतके दिवस मतदारसंघ सांभाळला; पण कधीही घाणेरडे राजकारण केलेले नाही’, असे विधान कदम यांनी केले आहे. (Ramesh Kadam praised former MLA Rajan Patil)

तुरुंगातून सुटून आल्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर माजी आमदार रमेश कदम हे मोहोळ मतदारसंघात आले आहेत. ते सध्या मतदारसंघातील लोकांशी संवाद साधत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून गावभेट दौऱ्यात आलेले अनुभव कथन करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्याविषयी आपले मत नोंदविले.

माजी आमदार राजन पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपला मोहोळ मतदारसंघ सांभाळून ठेवलेला आहे. निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतरही त्यांनी कधी दारू, पार्ट्या असले घाणेरडे राजकारण केलेले नाही. त्या गोष्टीबाबत त्यांना मानावेच लागेल, असे रमेश कदम यांनी मोठ्या मनाने मान्य केले.

आमदार यशवंत माने यांच्या कामाबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. पण विकास हा सगळीकडचा झाला पाहिजे. तालुक्यातील ठराविक भागाचाच विकास झालेला आहे, अशी ओरड आहे. ज्या भागाचा विकास झालेला नाही, त्या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

कदम म्हणाले की, मतदारसंघातील अनेक पुढारी गावभेट दौऱ्यात माझ्यापासून अंतर राखून होते. पण जनतेचे माझ्यावर अमाप प्रेम असल्याचे दिसून आले. अनेक नेते म्हणविणाऱ्यांनी खासगीत भेटून आम्ही तुमच्याबरोबरच असल्याचे सांगितले आहे.

मतदारसंघातील गावभेट दौरा संपल्यानंतर लवकरच मी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेणार आहे. त्यात जनता जो निर्णय देईल, तो मला शिरसावंद्य असेल. पण, मोहोळ मतदारसंघ जसा सरळ वाटतो, तेवढाच तो डेंजरही आहे, असेही माजी आमदार कदम यांनी स्पष्ट केले. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्यांसोबत आपण जाणार असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT