Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : इतिहासात गद्दार म्हणून रामराजेंची नोंद होईल... जयकुमार गोरे

Umesh Bambare-Patil

बिजवडी : स्वतःच्या पक्षाशी, वरिष्ठ नेत्यांशी, सातारा जिल्ह्याशी आणि इथल्या जनतेशी आयुष्यभर बेईमानी करणारे रामराजे नाईक निंबाळकर सुर्याजी पिसाळांनंतरचे सर्वात थोर गद्दार आहेत. ज्या पक्षाने त्यांना भरभरुन दिले त्या पक्षाशी आणि त्या पक्षाच्या प्रमुखांशी बेईमानी करायला कधीच मागेपुढे न पहाणाऱ्या रामराजेंची इतिहासात गद्दार म्हणून नक्कीच नोंद होईल, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.

वाजपेयी यांच्यानंतर भाजपमध्ये आमदार जयकुमार गोरे हेच थोर नेते आहेत, अशी टीका रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यावर आमदार गोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्वराज्याशी बेईमानी करणारे काही गद्दार होवून गेले. त्यात सुर्याजी पिसाळांचे नाव सर्वात अगोदर घेतले जाते. यापुढे सुर्याजी पिसाळांनंतर आमदार रामराजे यांचे नाव थोर गद्दार म्हणून घेतले जाईल.

रामराजे आजपर्यंत पडद्यामागून खेळ्या आणि गेमाच करत आले आहेत. मदत करणाऱ्यांचा काटा काढण्यात ते पटाईत आहेत. जिल्ह्यात स्वपक्षाच्याच आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पटील आणि इतर अनेकांचे काटे काढण्यात रामराजेंनी कधी मागेपुढे पाहिले नाही. ज्या पक्षाने त्यांना भरभरुन दिले, त्या पक्षाशी सोयीनुसार गद्दारी करायला ते सर्वात पुढे असतात.

राष्ट्रवादीत असूनही ते अजित दादांना विरोध करतात. जिल्हा बॅंकेत बसून खुशामतगार चार चौघांबरोबर बसून षडयंत्रे रचण्यात राजे वाकबगार आहेत. त्यांनी आजपर्यंत जिल्ह्याशी, इथल्या मातीशी आणि जनतेशी कायम गद्दारीच केली आहे. त्याबाबतीत त्यांचा कुणीच हात धरु शकणार नाही. माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यांबाबत त्यांच्या मनात नेहमीच आकस राहिला आहे.

पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागाला पाणी देता येणार नाही असे हेच महाभाग नेहमी म्हणायचे. माण , खटावला पाणी मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे रामराजे निवडणूका आल्या की माण, राजकारणाचा बाजार मांडतात. गोरे म्हणाले, म्हसवड एमआयडीसी कोरेगावला नेण्याचे प्रयत्न रामराजेंनीच केले. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा डाव मी यशस्वी होवू देणार नाही. आजपर्यंत त्यांनी माझ्याविरोधात अनेक षडयंत्रे रचून मला रोखण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सर्वसामान्य घरातील असूनही जनतेच्या पाठबळाच्या जोरावर मी त्यांची षडयंत्रे यशस्वी होवू दिली नाहीत.

जिल्हा बँकेचा पोलखोल करणार...

जिल्ह्यातील काही नेते स्वच्छ राजकारण, समाजकारणाची झूल पांघरुन जनतेची दिशाभूल करत आले आहेत. मात्र, हेच नेते प्रत्यक्षात पडद्याआडून काय आणि कोणते कारनामे करतात याची पोलखोल लवकरच करणार आहे. जिल्हा बॅंकेत बसून काय चालते हेही एकदा जनतेसमोर मांडावे लागणार असल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT