Satara, 03 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील एका हॉटेलमध्ये जागा वाटपावर बैठक झाली. मात्र, जागा वाटपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. या बैठकीनंतर नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचीच चर्चा रंगली आहे. बैठकीतून सर्वांत पहिल्यांदा पालकमंत्री शंभूराज देसाई बाहेर पडले आणि त्यांनी मकरंदआबा तुमच्याशी बैठकीबाबत बोलतील, असे सांगितले. त्यानंतर आलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर ‘सध्या मी रिटायर्ड आहे’ अशी गुगली टाकली, त्यामुळे रामराजेंनी सातारा जिल्हा सहकारी बॅंकेची सूत्रे सोडल्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांच्या वाटपासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पहिली अधिकृत समन्वय बैठक शुक्रवारी रात्री झाली. बैठकीला भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खासदार नितीन पाटील, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई तसेच, शिवसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. मात्र, जागा वाटपावर तोडगा निघू शकलेला नाही.
बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल २३६ उमेदवारी अर्ज आल्यामुळे बंडखोरी रोखणे आणि इच्छुकांची माघार घडवून आणणे, हे महायुतीसमोर मोठे आव्हान आहे. एकत्रित पॅनेल उभे करण्याबाबत चर्चा सुरू असली तरी भाजपच्या वाढीव जागांच्या मागणीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सावध पवित्रा घेतला गेला आहे. अंतिम तोडग्यासाठी या दोन्ही पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बैठकीतून पहिल्यांदा पालकमंत्री शंभूराज देसाई बाहेर पडले. त्यांना मकरंदआबांचे नाव लवकर आठवेना. ते म्हणाले, ते...हे आपले... माननीय मंत्री महोदय...मकरंदआबा बोलतील आपल्याशी...रामराजेसाहेब बैठकीत आहेत... पण मकरंदआबा बोलतील, असे म्हणत निघून गेले.
शंभूराज देसाई यांच्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले बाहेर आले, त्यांनी रामराजेंकडे बोट दाखवत काढता पाय घेतला. पण रामराजेंनी तर पहिल्यांदा हातच जोडले. त्यानंतर दोन मंत्री असताना माझ्या मागं का लागतं, असा उलटा सवाल केला. त्यावर तुम्ही ज्येष्ठ आहात, असे म्हणताच ‘सध्या मी रिटायर्ड आहे,’ अशी गुगली टाकली. रामराजे गाडीत जाऊन बसल्यानंतर त्यांच्याशी शिवेंद्रसिंहराजेंनी चर्चा केली.
त्यानंतर पत्रकारांनी मकरंद पाटील यांच्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यांना शंभूराज देसाई यांनी आपल्यावर जबाबदारी दिली आहे, असे सांगितले. त्यावर मकरंदआबांनी ‘होय होय, घेतलीय जबाबदारी मी एकट्याने सगळ्यांची’ असे म्हणत मिश्किल टिपण्णी केली. मात्र, रामराजे नाईक निंबाळकरांच्या गुगलीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या बॅंकेत रामराजे नाईक निंबाळकर सर्वाधिक ज्येष्ठ संचालक आहेत. शिवाय अलीकडेच त्यांचे उदयनराजे यांच्यासोबतही सूत जुळले आहे. मात्र, फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी त्यांचा उभा दावा आहे, त्यामुळे रामराजेंची जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील भूमिका महत्वाची ठरते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.