Satara, 08 October : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे जनसन्मान यात्रा आणि लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दुसरीकडे पक्षाचे नेते आणि आमदार मात्र एकामागून एक पक्ष सोडून जात आहेत. सातारा जिल्ह्यातील मातब्बन नेते, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विस्कटलेली पक्षाची घडी अजितदादा विधानसभेत कशी बसवणार, याकडे लक्ष असणार आहे.
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सध्या अजित पवार यांच्यासोबत असलेले फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हेही तुतारी हातात घेणार आहेत. येत्या सोमवारी (ता. 14 ऑक्टोबर) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
फलटणचे आमदार दीपक चव्हाण जर रामराजेंसोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर अजित पवार (Ajit Pawar) यांना फलटणसाठी नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे. कारण, मागील आठवड्यातच अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण, आता दीपक चव्हाण यांनीही रामराजेंसोबत अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, माढा लोकसभा मतदारसंघात येणारे सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनीही अजित पवार यांच्यापासून फारकत घेतली आहे. त्यांनी मुलासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी मुलाला अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुलाला अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे जाहीर केले असताना त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे यांनीही करमाळ्यातून पुन्हा अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यापासून दूर जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.