Gavit Vs Pawar: विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांच्या आमदारांची पूर्ती कोंडी करण्याचा डाव टाकला आहे. पवारांच्या खेळीने अजित पवार गट संकटात सापडला आहे.
नाशिकच्या जागा वाटपात अपेक्षेप्रमाणे कळवण- सुरगाणा हा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने `माकप`ला सोडला आहे. महाविकास आघाडीच्या आणि डाव्या आघाडीच्या चर्चेत दोन मतदारसंघ `माकप`ला सोडण्यात आले आहेत. हा निर्णय निश्चित झाला आहे.
या निर्णयामुळे कळवण- सुरगाणा हा `माकप`चा परंपरागत बालेकिल्ला माजी आमदार जे.पी. गावित यांच्यासाठी आता मोकळा असेल. त्यात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मोठी प्रसाद मिळेल.
काँग्रेस पक्षाचा देखील या भागात प्रभाव आहे. एकंदरच महाविकास आघाडीकडे कळवण आणि सुरगाणा या दोन्ही तालुक्यांमध्ये बेस आहे तो यंदा जे. पी. गावित यांच्या मदतीला असेल. त्यामुळे महायुतीचे आमदार पवार यांची कोंडी करण्याचा डाव शरद पवार यांनी टाकला आहे.
या मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होईल असे सध्याचे चित्र आहे. आमदार नितीन पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ केली. त्यावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या होत्या.
मतदारसंघातील विकास कामे आणि निधी यासाठी आमदार पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेले. मात्र विधानसभा निवडणुकीत त्याचा त्यांना त्याचा लाभ होतो की झळ बसते हे लवकरच स्पष्ट होईल.
विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार अल्प मतांनी विजयी झाले होते. आमदार पवार यांना ८६,८७७ मते मिळाली होती. माजी आमदार जे. पी. गावित यांना ८०,२८१ तर शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यांना २३,०५२ मते मिळाली होती. आमदार पवार यांना अवघे सहा हजारांचे मताधिक्य होते.
माजी आमदार गावित यांना यंदा शिवसेना ठाकरे गटाच्या मतांची रसद मिळेल. त्याचबरोबर आमदार पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली विभागणी माकपचे गावित यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
आमदार पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामकाजाच्या आधारे किती नवे लोक जोडले याची परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडे हा मतदार संघ न घेता तो डाव्यांना दिला.
पवार यांनी टाकलेला हा परफेक्ट डाव आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार गावित यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे यांना झाला.
आता महाविकास आघाडी विधानसभेला उमेदवार न देऊन त्याची परतफेड करणार आहे. त्याचा फायदा डाव्या आघाडीला होईल. हा आमदार पवार यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो. यामध्ये आमदार पवार आणि माजी आमदार गावित या परंपरागत लढतीत कोणाची सरशी होते, याची आता उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.