Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil-Narayan Rane : राणेंनी माझ्यासाठी सूट शिवून घेतला अन्‌ तो घालूनच मी अर्थसंकल्प मांडला; जयंत पाटील

Assembly Session : त्यावेळी त्यांनी ‘जयंतराव, विरोधी पक्षनेत्यांशी बोललं पाहिजे. राणे येथे बसले आहेत, असे सांगून फोन त्यांच्याकडे दिला.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : अर्थसंकल्प मांडण्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या (अर्थमंत्री) दालनात आलो, तर माझ्याआधी टेलर हजर. मी म्हटलं माझ्या अंगाला हात नाय लावायचा. मी काही माप देणार नाही. तर तो सारखं म्हणायचा, ‘नाही नाही साहेब, आम्हाला साहेबांनी सांगितलंय.’ अखेर बळजबरीनं माझं माप घेतलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी नारायण राणेंनी माझ्यासाठी शिवलेला सूट घालूनच मी अर्थसंकल्प मांडला, असा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितला. (Rane stitched a suit for me and I presented the budget while wearing it : Jayant Patil)

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी किस्सा सांगितला. ते म्हणाले की, नारायण राणे (Narayan Rane) असे विरोधी पक्षनेते होते, की त्यांनी नुसतं डावीकडं बघितलं तर सगळं सैन्य खाली बसायचं. एवढा त्यांचा दरारा हेाता. नुसतं वळून मागं बघितलं तर विरोधी पक्षातील आमदार अर्ध्या सेकंदात खाली बसायचे. एखादा विषय बघितला की ते त्याचा खोलावर अभ्यास करायचे.

मी त्या वेळी अर्थमंत्री होतो. प्रत्येक अर्थसंकल्पावेळचं त्यांचं भाषण इतकं अभ्यासपूर्ण असायचं की, सभागृहात असं वाटायचं की काय जयंत पाटलांनी अर्थसंकल्प मांडलाय. हे सगळं चुकीचं मांडलेलं आहे. एवढा प्रचंड प्रभाव ते भाषणातून तयार करायचे. एकनाथ खडसेसुद्धा असेच भाषण करायचे, असेही पाटील यांनी नमूद केले.

जयंतराव म्हणाले की, विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षातील लोकांचं वातावरण सौदार्हपूर्ण असलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांशी चांगलं आणि आपुलकीनं वागलं पाहिजे. त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पण, विरोधी पक्षनेत्याने सत्तारुढ पक्षातील नेत्याची कशी काळजी घेतली पाहिजे, याचं एक उदाहरण मी सांगेन.

एकदा मी अर्थसंकल्प मांडणार होतो. त्याचदिवशी दुपारी चार वाजता क्रिकेटची मॅच होती. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष असलेले अरुण गुजराथी यांना मी विनंती केली की मला अर्थसंकल्प जरा लवकर मांडण्याची परवानगी मिळावी. कारण, मॅच सुरू झाल्यानंतर कोणी अर्थसंकल्प पाहणार नाही. त्यावेळी त्यांनी ‘जयंतराव, विरोधी पक्षनेत्यांशी बोललं पाहिजे. राणे येथे बसले आहेत, असे सांगून फोन त्यांच्याकडे दिला, असे पाटील यांनी सांगितले.

तिकडून राणे म्हणाले, ‘जयंत, ते जाऊ दे. तू म्हणशील तो वेळ. पण कपडे काय घालणार ते सांग.’ मी म्हटलं, ‘शर्ट पॅन्ट घालणार आहे. कारण त्यावेळी मी वजन कमी केलं होतं. त्यामुळे काही बसंना झालं आहे.’ तेवढ्यात ते म्हणाले, ‘अरे नाही नाही, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटात आणि बुटातच आला पाहिजे.’ मी त्यावर ‘अहो साहेब, बसत नाही, साईज जरा बिघडली आहे’ असे उत्तर दिले. त्यावर ठीक आहे, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्प मांडण्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या (अर्थमंत्री) दालनात आलो, तर माझ्याआधी टेलर हजर. मी म्हटलं माझ्या अंगाला हात नाय लावायचा, मी काही माप देणार नाही. तर तो सारखं म्हणायचा, ‘नाही नाही साहेब, आम्हाला साहेबांनी सांगितलंय.’ अखेर बळजबरीनं माझं माप घेतलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी नारायण राणे यांनी माझ्यासाठी शिवलेला सूट घालूनच मी अर्थसंकल्प मांडला, असा त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा संबंध मधुर होता, अशी आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT