ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार अभिजीत पाटील यांना खुले चॅलेंज देत त्यांच्या पराभवासाठी रणजित शिंदे यांना भाजपमध्ये घेतल्याचे स्पष्ट केले.
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेतल्यामुळे अभिजीत पाटील यांची राजकीय अडचण वाढल्याचा उल्लेख गोरे यांनी केला.
येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून या राजकीय संघर्षाची ठोस सुरुवात दिसणार असल्याची गोरे यांची भूमिका.
Pandharpur, 21 November : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांना खुले चॅलेंज दिले आहे. माढ्यातील सर्व निवडणुकांमध्ये आमदार अभिजीत पाटील यांचा पराभव करण्यासाठीच माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्याची सुरवात झालेली दिसेल, असा खणखणीत इशाराही गोरे यांनी दिला आहे.
आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप विरोधात विठ्ठल परिवार म्हणून मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काही प्रमाणात यशही आले. पण, आमदार पाटील यांनी तिसरी आघाडी करून सारिका साबळे यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी साबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार पाटील यांची राजकीय कोंडी झाली आहे. अशातच आज पालकमंत्री गोरे यांनी आमदार पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.
मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप उमेदवार श्यामल शिरसट यांच्या प्रचाराची सुरवात करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आमदार पाटील यांचा समाचार घेतला. या वेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, संजय आवताडे, लक्ष्मण शिरसट आदी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, आमदार अभिजीत पाटील हे त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत, आम्ही आमच्या पक्षाचे काम करत आहे. परंतु येत्या सर्व निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून रणजित शिंदे यांना भाजपने ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभिजीत पाटील कितीही आमच्या जवळ आले तरी ते आमचे आता विरोधक आहेत. त्याची सुरवात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून झालेली दिसेल.
आमदार शहाजीबापू पाटील हे आमचे मित्र आहेत. त्यांना मी आदर्श मानतो. सांगोला नगरपालिका निवडणुकीसंदर्भात युतीचा प्रस्ताव त्यांनी दिलेला नाही. निवडणुकीच्या काळात आमची एकदा भेट झाली. त्यावेळी मैत्रीपूर्ण लढण्याबाबत चर्चा झाली. स्थानिक लोकांनी एकत्रित येवून आघाडी केली आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे व्यथीत झाले आहेत. निवडणुकीनंतर ते आमच्या सोबतच राहतील असेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
राजकीय पुनर्वसनाची ही निवडणूक नाही : परिचारक
पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी आहे. एखाद्या व्यक्तीचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी नाही, असा टोला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भगीरथ भालके यांचा नामोल्लेख न करता लगावला. विरोधक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा मुद्दा घेऊन राजकारण करत आहेत. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. केवळ भावनेचे राजकारण करुन चालत नाही किंवा एखाद्याचे राजकीय पुनर्वसन करण्याची ही निवडणूक नाही. विकासाला मतदान करण्याची ही निवडणूक असल्याचेही परिचारक यांनी सांगितले.
Q1. जयकुमार गोरे यांनी कोणाला चॅलेंज दिले?
A. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार अभिजीत पाटील यांना.
Q2. रणजित शिंदे यांना भाजपात का घेतले?
A. माढ्यातील सर्व निवडणुकांमध्ये अभिजीत पाटील यांचा पराभव करण्यासाठी.
Q3. संघर्षाची सुरुवात कुठून होणार आहे?
A. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून.
Q4. मंत्री गोरे यांनी शहाजीबापू पाटील यांच्याबद्दल काय सांगितले?
A. ते आमचे मित्र असून निवडणूक संपल्यानंतर ते आमच्यासोबतच राहतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.