Ranjitsinh Mohite Patil, Ranjitsinh Naik Nimbalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politics : भाजपच्या कार्यक्रमावर मोहिते पाटलांचा बहिष्कार? महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

Sachin Fulpagare

Madha Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा सांगितल्यानंतर मोहिते पाटलांनी थेट भाजप आणि महायुतीच्या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. उद्या ( बुधवारी ) नातेपुते ( तालुका माळशिरस ) येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा होत असला तरीही आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील या मेळाव्यास उपस्थित राहणार नाहीत, असे सांगितले जाते. माळशिरस तालुक्यात भाजपचा कार्यक्रम होत असताना मोहिते पाटलांचा त्यावर अघोषित बहिष्कार पाहून मतदारसंघात महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा उद्या बुधवारी (दि. २२ रोजी ) नातेपुते येथे आयोजित केलेला आहे. भाजपच्या महाविजय २४ अभियानांतर्गत अभियानाचे प्रदेश प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय, माढ्याचे खासदार मंत्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आहेत. मात्र, या स्नेहमेळाव्यास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहणार नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या मेळाव्याला कोण-कोण येणार?

महायुतीचा मेळावा असल्याने या मेळाव्यास सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार समर्थक उत्तम जानकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, माजी प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, जयवंतराव जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

महायुतीच्या स्नेहमेळाव्यास जिल्ह्यातील महायुतीतील बहुसंख्य नेतेगण असले तरी बहुतेकांशी मोहिते पाटील यांचे राजकीय मतभेद असल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी कोणीही हजर राहणार नाहीत, असे समजते.

...म्हणून मोहिते पाटील उपस्थित राहणार नाहीत!

मोहिते पाटील यांचा माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध असून, आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदरच भाजपमधील मतभेद उघड्यावर आलेले आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बहुतांश विरोधक या महामेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच रणजितसिंह मोहिते पाटील हे या मेळाव्यास गैरहजर राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT