Shrikant Bharatiya-Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपतून लवकरच होणार हकालपट्टी; फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे स्पष्ट संकेत

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणारे मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी यापूर्वी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 November : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी शिफारस जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे, त्यांची भाजपतून लवकरच हकालपट्टी होईल, अशी मााहिती भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणारे रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी यापूर्वी म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी केली आहे. केदार-सावंत यांच्यापाठोपाठ कल्याणशेट्टी यांनीही शिफारस केल्याने मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.

विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते (Ram Satpue) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत जानकर यांच्याकडून राम सातपुते यांना पराभव झाला होता. त्या पराभवानंतर सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात शस्त्र उपसले आहे.

माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली. साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली, त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले.

भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. रणजितसिंह मोहिते पाटील यांची तत्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी राम सातपुते यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी केली होती.

दरम्यान, सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले आमदार श्रीकांत भारतीय यांनी राम सातपुते यांची तक्रार आणि आमदार कल्याणशेट्टी यांनी केलेली शिफारस याबाबत माहिती देत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

पवारांनी ईव्हीएमवर शंका घेणेे दुर्दैवी

ईव्हीएमवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शंका घेतली, तर आम्ही समजू शकतो. पण, देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काम करणारे शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी शंका घेणे दुर्दैवी आहे, अशी खंतही आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT