Solapur, 13 April : माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार, हे आता निश्चित झाले आहे. बलाढ्य भाजपच्या विरोधात लढण्याचे ‘धैर्य’ दाखवणारे धैर्यशील यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सूचक फोटो ट्विट करत धैर्यशील यांच्या राजकीय कामाचा परीघ अधिक विस्तारत जावो, असे म्हटले आहे
माढ्यातून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याची भूमिका घेणारे धैर्यशील (Dhairyasheel Mohite Patil) यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ बंधू या नात्याने रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) यांनी धैर्यशील यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, धैर्यशील भैयाने विजय-प्रताप युवा मंचच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्याने अमीट ठसा उमटविणाऱ्या धैर्यशील भैयामध्ये संघटन कौशल्य, कार्यपद्धती, जिद्द, तसेच जबाबदारीने हाती घेतलेले काम तडीस नेण्याची क्षमता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भैया आपल्या सामाजिक आणि राजकीय कामाचा परीघ भविष्यात अधिक विस्तारला जावो, ही मोठा बंधू म्हणून सदिच्छा..! धैर्यशीलभैया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला यश, उदंड कीर्ती, सन्मान, निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना..! अशा शब्दांत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून (BJP) माढ्याच्या उमेदवारीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलण्यात आले, त्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघात फिरून जनमताचा अंदाज घेतला. त्यात धैर्यशील यांनी शरद पवार यांच्या तुतारीवर निवडणूक लढवावी, असा रेटा त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला. त्यामुळे मोहिते पाटील यांनीही भाजपला राम राम करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यातील मोदीबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्या भेटीत मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. अकलूज येथे उद्या (ता. 14 एप्रिल) त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे, तर पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 16 एप्रिल) धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.