Solapur, 19 October : पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला असून विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आजच सायंकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) हे माढ्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यात कोणताही अडथळा ठरू नये, यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या आमदारकीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील हे शुक्रवारी (ता. 18 ऑक्टोबर) शरद पवार यांना भेटायला यशवंतराव चव्हाण सेंटरला गेले होते. मात्र, त्या ठिकाणी ते पवारांना न भेटताचा परत आले होते. त्यामुळे माहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP SP) प्रवेशाची चर्चा लोकसभा निवडणुकीपासून रंगली होती.
रणजितसिंह यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडून माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासूनच रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपपासून दुरावले होते. त्यांनी भाजपच्या प्रचारातही सहभाग घेतला नव्हता. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची सारी सूत्रे शिवरत्न बंगल्यावर बसून तेच हलवत होते.
देवेंद्र फडणवीस यांची अकलूजमध्ये सभा होती, त्यावेळीही रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर गेले नव्हते. मात्र, फडणवीसांचे स्वागत करण्याचे औचित्य त्यांनी सांभाळले होते. पण, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फडणवीस यांना स्वागत स्वीकारण्यापासून रोखले होते. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला, त्यानंतर मोहिते पाटील यांचा आत्मविश्वास वाढत गेला.
अकलूज येथे नुकताच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार असूनही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कोणत्या प्रकारची तडजोड करायला तयार आहे, असे विधान केले होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षांतराचे संकेत मिळाले होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.