Ranjit Sinh Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjit Sinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांची ‘सायलेंट’ भूमिका कोणाच्या फायद्याची?

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीच्या प्रत्यक्ष निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सहभाग घेतला नाही, त्यामुळे मोहिते पाटील यांची भूमिका लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही ‘सायलेंट’च राहिली आहे. मात्र, मोहिते पाटील यांची ही ‘सायलेंट’ भूमिका कोणाच्या फायद्याची ठरणार, याचा उत्सुकता असणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 November : लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षीय राजकारणापासून दूर झालेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत ‘सायलेंट’च राहिली आहे. नाही म्हणायला त्यांनी करमाळा आणि माढा मतदारसंघाच्या अनुषंगाने समर्थकांच्या दोन बैठका घेतल्या. त्यानंतर ते निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पडद्याआडून ते काही मतदारसंघांची सूत्रे हलवत असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून माढा मतदारसंघातून उमेदवारीत डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील (Mohite Patil) यांनी भाजपमध्ये बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतली आणि माढ्यात चमत्कार करून दाखवला. त्यावेळी राजकीय मानापान नाट्य रंगले होते, त्यात मोहिते पाटील यांनी भाजपला न जुमानता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

त्या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या कुटुंबीयांत एक अलिखित नियम झाला होता, त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjit Sinh Mohite Patil ) यांनी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नये, असे शिवरत्न बंगल्यावर ठरले होते. त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या प्रचारापासून चार हात लांब होते.

दुसरीकडे, धैर्यशील माहिते पाटील हे उभे असतानाही ते भावाच्याही प्रचारात सहभागी झाले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची सूत्रे बऱ्यापैकी रणजितसिंह मोहिते पाटील हेच हलवित होते, हे पुढे स्पष्ट झाले होते.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अकलूजमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत खासदारांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार असूनही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यांनी नुसती हजेरीच लावली नव्हती तर भाषणही ठोकले होते.

त्या भाषणामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने जातील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, माढ्यातून उमेदवारीचा अपेक्षित निर्णय न झाल्याने ते विधानसभा निवडणुकीपासूनही दूरच राहिले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजपसोबतच आहेत, असा दावा केला होता. प्रत्यक्षात, मात्र ते भाजपच्या प्रचारापासून दूर आहेत. तसे ते महाविकास आघाडीच्या प्रचारापासून हे दूर आहेत. मात्र, काही मतदारसंघातील सूत्रे ते हलवित असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीच्या प्रत्यक्ष निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सहभाग घेतला नाही, त्यामुळे मोहिते पाटील यांची भूमिका लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही ‘सायलेंट’च राहिली आहे. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांची ही ‘सायलेंट’ भूमिका कोणाच्या फायद्याची ठरणार, याचा उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT